Ratnagiri News – एसटी बसमधून महिलेच्या बॅगेतील अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पुणे-राजापूर एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या रॅकवर ठेवलेल्या बॅगेतून अज्ञात चोरट्याने तब्बल २ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना २० सप्टेंबर रोजी राजापूर तालुक्यात घडली. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनुजा प्रशांत कांबळे (वय ३२) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे या २० सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता ते सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान पुणे-राजापूर एसटी बसमधून कोल्हापूर ते राजापूर असा प्रवास करीत होत्या. प्रवासादरम्यान त्यांनी आपली काळ्या रंगाची बॅग बसमधील रॅकवर ठेवली होती. राजापूर तालुक्यातील प्रवासादरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या परवानगीशिवाय लबाडीच्या उद्देशाने बॅग चोरी करून त्यातील सोन्याचे दागिने लंपास केले.

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये २५ ग्रॅम वजनाचे सुमारे १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, ५ ग्रॅम वजनाचे ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दोन टॉप्स, ५ ग्रॅम वजनाची ३५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन आणि २.५ ग्रॅम वजनाची १७ हजार ५०० रुपये किमतीची सोन्याची अंगठी यांचा समावेश आहे. या सर्व दागिन्यांची एकूण किंमत २ लाख ६२ हजार ५०० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी २० सप्टेंबर रोजी रात्री ९.०९ वाजता तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Comments are closed.