Ratnagiri News – कमी-अनियमित पावसाने कोकणातील भात-नाचणीचे मोठे नुकसान; उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीती, भास्कर जाधव यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले आहे की, यंदाचा खरीप हंगाम कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी संकटाचा ठरला आहे. विशेषतः कोकणातील प्रमुख पिके असलेल्या भात आणि नाचणीवर कमी व अनियमित पावसाचा मोठा परिणाम झाला. पावसाचे आगमन उशिरा झाल्याने भाताची लागवड नियोजित वेळेपेक्षा उशिरा करावी लागली. अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करून बियाणे, खते, औषधे, मजुरी तसेच शेतीच्या मशागतीसाठी खर्च केला; मात्र लागवडीनंतरही पावसाची स्थिती समाधानकारक राहिली नाही. त्यामुळे भात व नाचणी पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून पीके गर्भात असतानाच पाण्याअभावी सुकून गेली आहेत.
काही ठिकाणी पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी केलेला खर्च वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आमदार जाधव यांनी केली आहे.
पत्रात आगामी काळातील पाणीटंचाईच्या प्रश्नाकडेही आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी राज्यात आवश्यक प्रमाणात पाऊस झालेला नसून, सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पडलेला पाऊस दरवर्षीच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे १५ टक्क्यांनी कमी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे कोकणातील भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. या संकटावर उपाय म्हणून राज्य सरकारने कोकणातील उपलब्ध पाणीसाठ्यांचे तातडीने संवर्धन व नियोजन करण्याच्या दृष्टीने विशेष उपाययोजना आखावी, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
जलसंधारण, पाटबंधारे आणि जलसंपदा विभागांच्या माध्यमातून उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याबरोबरच डोंगर उतारावरून वाहून जाणारे पाणी अडवून ते भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी वापरण्याची आवश्यकता आमदार जाधव यांनी अधोरेखित केली आहे.
“यंदाच्या कमी पावसाचा परिणाम केवळ खरीप हंगामापुरता मर्यादित न राहता आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवरही होऊ शकतो. त्यामुळे शासनाने आतापासूनच नियोजन करून कोकणातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा द्यावा,” असा मुद्दा भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे.
Comments are closed.