SIR च्या माध्यमातून 3 कोटी 28 लाख मतदारांची नावे वगळली; मतदानाचा हक्क हिरावून घेत लोकशाहीचा गळा घोटण्याचा मोठा डाव – हर्षवर्धन सपकाळ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळून, त्यांना मतदानाच्या संवैधानिक अधिकारापासून वंचित ठेवत आहे. देशभरात सुरु असलेले हे षडयंत्र महाराष्ट्रातही आले असून एसआयआरच्या नावाखाली राज्यातील 3 कोटी 28 लाख मतदारांची नावे वगळली आहेत, हा सर्व प्रकार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरु असून निवडणूक आयोग वगळलेल्या मतदारांची यादी जाहीर करत नाही, कोणतेही आकडे देत नाही. निवडणूक आयोगाच्या कामात पारदर्शकता नाही, सर्व कारभारच गौडबंगाल व संशयास्पद आहे. हे एक मोठे षडयंत्र असून मतदानाचा हक्क हिरावून घेत लोकशाहीचा गळा घोटण्याचा मोठा डाव आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची आज भेट घेतली. या शिष्टमंडळात विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री नसीम खान, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे उप नेते आ. अमिन पटेल, आमदार भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश शर्मा, प्रदेश सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर, अभिजीत सपकाळ आदी उपस्थित होते.

निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राज्यात मतदारांची संख्या 9 कोटी 78 लाख होती, यातून 3 कोटी 28 लाख मतदारांना वगळले तर 6.5 कोटीच मतदार राहतात. महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे तर प्रौढ लोकसंख्या 10 कोटीच्या वर असल्याचे सरकार आकडे सांगतात, हे आकडे पाहता 10 कोटी मतदार असायला हवेत पण निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार ते 6.5 कोटीच आहेत. सरकारच्या वेगवेगळ्या विभागातील आकडे वेगवेगळे कसे. यातूनन निवडणूक आयोगाचा दुटप्पी कारभार व हलगर्जीपणा दिसत आहे. राज्यात गणेशोत्सवासह इतर सण व उत्सव असताना दावे व हरकती नोंदवण्यासाठी 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबरची वेळ निवडणूक आयोगाने दिली आहे, ही वेळ तीन महिने वाढवून दिली पाहिजे पण निवडणूक आयोगाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

Comments are closed.