आयसीसीच्याच निर्णयांनी ODI क्रिकेट धोक्यात? एका नव्या अहवालामधून मोठा खुलासा

एकदिवसीय क्रिकेटच्या भविष्याबाबत अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे. क्रिकेटच्या या महत्त्वाच्या प्रकाराच्या सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) काही महत्त्वाचे निर्णय घेणे आवश्यक असताना, एका माहितीमधून असे समोर आले की आयसीसी स्वत:च या प्रकाराचा गळा घोटत आहे.
एका ताज्या अहवालानुसार, आयसीसी एकदिवसीय प्रकारच्या क्रिकेटला आणखी कमी महत्व देणार आहे. आयसीसी या आठवड्यात दुबईमध्ये एका कार्यशाळेसाठी एकत्र येणार आहे, ज्यामध्ये पुढील ‘फ्युचर टूर्स प्रोग्राम’ (FTP) महत्त्वाचा ठरणार आहे आणि सदस्य देश 2027 ते 2031 या कालावधीतील पुढील आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रकाला आकार देण्याचा प्रयत्न करणार आहेत.
या चक्रामध्ये टी20 सामने अधिक असणार आहेत. त्यामुळे एकदिवसीय सामन्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. तसेच आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी स्वत:च टी20 क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचे समर्थन केले आहे.
टी 20 सामने सहयोगी देशांसाठी उपयुक्त ठरत आहेत. नामिबिया क्रिकेटचे अध्यक्ष आणि आयसीसी बोर्डाचे नवनियुक्त संचालक, रुडी व्हॅन व्हुरेन यांनी अलीकडेच सांगितले की, त्यांना टी 20 विश्वचषकात सहयोगी देशांसाठी अधिक संधी दिसत आहेत. याचा अर्थ एकदिवसीय क्रिकेट काही पूर्ण बंद होणार नाही.
विश्वचषक हा एकदिवसीय क्रिकेटमधील एक मोठा भाग आहे. यासाठी एकदिवसीय क्रिकेट अर्थपूर्ण बनवण्यासाठी सदस्य राष्ट्रांमध्ये चर्चाही सुरू आहे. यावरून तिरंगी मालिका आणि चतुर्भुज मालिका सुरू होऊ शकतात.
भारताने खेळल्या केवळ दोन एकदिवसीय मालिका
आयपीएल 2026 पासून भारताने केवळ दोन एकदिवसीय मालिका खेळल्या आहेत. तसेच दोन कसोटी आणि पाच टी 20 मालिका खेळल्या आहेत. आशियाई खेळ आणि ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळले जाते, मात्र तेथेही टी 20 प्रकारचे सामने होतात, यावरून एकदिवसीय क्रिकेट संपत आले आहे, याची जाणीव होते.
एफटीपीला अंतिम स्वरूप येण्यास अजून बराच वेळ असला तरी, मिळालेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारत यांच्या मालिका निश्चित झाल्या आहेत.
ॲशेस मालिका तिच्या नेहमीच्याच पद्धतीने सुरू राहील, ज्यामध्ये 2027 (इंग्लंडमध्ये), 2029-30 (ऑस्ट्रेलियामध्ये) आणि 2031 (इंग्लंडमध्ये) मालिका होतील, तर इंग्लंड 2029 मध्ये भारताचे यजमानपद भूषवण्यापूर्वी 2028 च्या सुरुवातीला कसोटी मालिकेसाठी भारताचा दौरा करेल.
तसेच आगामी चक्रात 2028 च्या उन्हाळ्यात होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकचे आव्हानही आहे. 1900 नंतर प्रथमच क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. हे खेळ इंग्लंडमधील उन्हाळ्याच्या मध्यावर, जुलै महिन्यात होणार आहे. (new ICC FTP report revealed that T20I in focus only few ODIs)
Comments are closed.