Ganeshotsav 2026 – अमेरिकेच्या स्वातंत्र्याची 250 वर्षे आणि संकल्पपूर्तीचा महासोहळा!

२०२६ हे वर्ष जगभरासाठी इतिहास, क्रांती आणि तंत्रज्ञानाचा एक दुर्मिळ महासंगम घेऊन येत आहे. एका बाजूला जगाचे चित्र बदलणाऱ्या ‘ॲपल’ (Apple) कंपनीची पन्नास वर्षे (अर्धशतक), दुसऱ्या बाजूला भारताच्या स्वातंत्र्याची तब्बल आठ दशके आणि तिसऱ्या बाजूला अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा २५० वा वर्धापन दिन (Semiquincentennial – पाऊण शतकमहोत्सव)! हे तीन टप्पे, तीन भिन्न देश आणि तीन वेगवेगळ्या प्रवासांचे प्रतीक असले, तरी त्यांच्यात एक अदृश्य, पण मजबूत धागा आहे — तो म्हणजे ‘वेगळा विचार करण्याचे धाडस, स्वतःचा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य आणि उद्याचा दिवस आजपेक्षा अधिक सुंदर असेल यावर असणारा ठाम विश्वास!’ याच त्रिवेणी संगमाचे आणि ‘अमेरिकन स्पिरिट’चे औचित्य साधून अमेरिकेत राहणाऱ्या एका मराठी कुटुंबाने या वर्षीचा गणेशोत्सव अत्यंत अनोख्या आणि भव्य रूपात साजरा केला आहे.

माझा प्रवास आणि गणेशोत्सवाचा अनोखा बंध

मागील १९ वर्षांपासून अमेरिकेत सातत्याने गणेशोत्सव साजरा करताना आणि गेल्या १६ वर्षांपासून ॲपल (Apple) कंपनीत काम करताना, मला या तिन्ही संस्कृतींचे आणि मूल्यांचे जवळून साक्षीदार होता आले. तंत्रज्ञानाने मानवी जीवन आणि संवाद कसा बदलला याचा अनुभव ॲपलमध्ये दररोज मिळतो, तर भारतीय मूळ आपल्याला आत्मनिर्णय आणि आपल्या परंपरांची आठवण करून देते.

“२०२६ हे वर्ष आपल्याला आठवण करून देते की इतिहास हा फक्त वर्षांची गणना करण्याचा नसतो, तर आपण आपल्या कल्पकतेने निर्माण केलेल्या नवीन शक्यतांचा असतो,” याच प्रेरणेतून या वर्षीच्या गणेशोत्सवाची थीम आणि भव्य देखावा साकार झाला आहे.

देखाव्यातून साकारलेला ‘पश्चिम ते पूर्व’ अमेरिकेचा ऐतिहासिक प्रवास

या वर्षीचा गणेशोत्सवाचा देखावा म्हणजे जणू “पश्चिम किनाऱ्यापासून ते पूर्व किनाऱ्यापर्यंतचा” संपूर्ण अमेरिकेचा एक जिवंत आणि नेत्रदीपक प्रवास आहे! वुडी गथरी (Woodie Guthrie) यांच्या प्रसिद्ध गाण्याच्या “This Land Is Your Land, This Land Is My Land” या ओळींना अनुसरून संपूर्ण अमेरिकेची विविधता आणि संस्कृती या देखाव्यातून मांडण्यात आली आहे:

पश्चिम किनारपट्टी (West Coast): सॅन फ्रान्सिस्कोचे वैशिष्ट्यपूर्ण टॉवर्स, चित्रपटसृष्टीची ओळख असणारी ‘हॉलीवूड’ (Hollywood) ची टेकडी, सॅन दिएगो (San Diego) आणि लास वेगासचे लखलखते बोर्ड.

मिडवेस्ट आणि दक्षिण: ग्रँड कॅनियन, ऐतिहासिक मार्ग 66, सेंट लुईसमधील भव्य गेटवे आर्क आणि टेक्सासमधील ऐतिहासिक द अलामो.

विज्ञान आणि इतिहास: फ्लोरिडामधील ‘जे. एफ. के. स्पेस सेंटर’ (JFK Space Center) जिथून मानवाने अवकाशात झेप घेतली, माऊंट रशमोर (Mount Rushmore) वरील राष्ट्राध्यक्षांची शिल्पे, आणि जिथे अमेरिकन संविधानाचा जन्म झाला तो फिलाडेल्फियाचा ‘इंडिपेंडन्स हॉल’ (Independence Hall) व ऐतिहासिक ‘लिबर्टी बेल’ (Liberty Bell).

राजधानी आणि पूर्व किनारपट्टी (East Coast): वॉशिंग्टन डी.सी. मधील व्हाइट हाऊस (White House), लिंकन मेमोरियल, वॉशिंग्टन मॉन्युमेंट आणि कॅपिटॉल हिल (संसद).

अंतिम टप्पा: न्यू यॉर्क शहराची प्रसिद्ध स्कायलाईन आणि सर्वांचे आकर्षण असणारा स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा — ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ (Statues of Liberty)! या सर्व प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक स्थळांच्या मागे असणारा “We the People” हा अमेरिकन संविधानाचा संदेश आणि २५० वर्षांच्या स्वातंत्र्याचा ध्वज संपूर्ण वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करतो.

परंपरेची आणि आधुनिकतेची सुरेख सांगड

एकीकडे अमेरिकेच्या २५० वर्षांचा गौरवशाली इतिहास आणि दुसरीकडे अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने विराजमान झालेले विघ्नहर्ता श्रीगणेश! सात समुद्रांपार राहूनही आपल्या संस्कृतीची मुळे घट्ट पकडून ठेवणे आणि ज्या भूमीत आपण राहतो तिच्या इतिहासाचा आणि स्वातंत्र्याचा सन्मान करणे, हाच संदेश या गणेशोत्सवाच्या देखाव्यातून देण्यात आला आहे. हा संपूर्ण देखावा कागदी मॉडेल्स (Paper Models) आणि हाताने तयार केलेल्या कलाकृतींमधून साकारण्यात आला आहे. यामध्ये माझी पत्नी अनघा हिचा सिंहाचा वाटा असून, माझा आणि माझ्या १० वर्षांच्या *आदीश* या मुलाचा वाटा मात्र खारुताईचा राहिला आहे!

काही वर्षे फक्त काळ मोजतात, तर २०२६ हे वर्ष इतिहास घडवत आहे! स्वातंत्र्य, कल्पकता आणि नव्या सुरुवातीच्या या भावनेला बाप्पाच्या चरणी नमन करून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

दिग्विजय अर्जुनराव जाधव (टीप: लेखक हे तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘सीनिअर मॅनेजर’ असून त्यांच्या नावावर ३५ पेक्षा जास्त अमेरिकन पेटंट्स (US Patents) नोंदणीकृत आहेत.)

लेखक मा.आ.उल्हासदादा पवार यांचे भाचे आहेत

Comments are closed.