'SIR'सह सर्व निर्णय एकमताने घेतले.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्व आरोपांना प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
Cस्थेने आतापर्यंत एकमुखानेच घेतले आहेत. कोणत्याही संस्थेत अधिकाऱ्यांमध्ये मतभेद आणि मतभिन्नता असतेच. तथापि, अंतिम निर्णय घेताना तो सर्वानुमते आणि एकमुखानेच घेतला जातो, असे प्रत्युत्तर केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेत, निवडणूक आयोगाच्या सदस्यांमध्ये गंभीर स्वरुपाचे मतभेद निर्माण झाले आहेत, असा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्या अहवालाला अनुषंगून आयोगाने त्याची बाजू ठामपणे स्पष्ट केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आठ बिंदूंमध्ये अधिकृत प्रत्युत्तर प्रसिद्ध केले आहे.
मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि अन्य दोन आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्यात मोठ्या प्रमाणात मतभेद आहेत. गेल्या 10 महिन्यांमध्ये 14 वेळा हे मतभेद अन्य दोन आयुक्तांनी उघडपणे मांडले आहेत. विशेषत: विशेष मतदारसूची सर्वेक्षणाच्या (एसआयआर) मुद्द्यावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि अन्य दोन आयुक्त यांच्यात तीव्र मतभिन्नता आहे. ज्ञानेश कुमार यांनी एसआयआरच्या संदर्भात अनेक निर्णय एकांगी पद्धतीने आणि अन्य आयुक्तांना विश्वासात न घेता घेतले आहेत, असा आक्षेप अन्य दोन आयुक्तांनी संसदेच्या सचिवांकडे लेखी स्वरुपात व्यक्त केला आहे. फॉर्म क्रमांक 6 मध्ये परिवर्तन करण्याचा ज्ञानेश कुमार यांनी अन्य आयुक्तांना विश्वासात न घेता निर्णय घेतला, असे आरोप एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात करण्यात आले आहे. त्यामुळे मोठी राजकीय खळबळ निर्माण झाली. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने हे सर्व आरोप ठोसपणे फेटाळले आहेत.
मतभेद असणे सर्वसामान्य
कोणत्याही संस्थेतील उच्च अधिकाऱ्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर मतभेद असणे नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तीन आयुक्तांमध्येही अशा प्रकारचे मतभेद निर्माण होतात. आयोगाच्या निर्णयासंबंधी चर्चा करताना हे मतभेद व्यक्त केले जातात. तथापि, चर्चेमधूनच या मतभेदांवर मार्ग काढला जातो आणि कोणत्याही मुद्द्यावरचा अंतिम निर्णय सर्व निवडणूक आयुक्त एकमुखानेच घेतात, अशी माहिती या संदर्भात निवडणूक आयोगाने दिली.
प्रक्रिया कशी असते
केंद्रीय निवडणूक आयोगाचे कामकाज ‘मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवाअटी आणि कार्यालयीन कालावधी) कायदा 2023 अनुसार चालते. या कायद्याचा अनुच्छेद 18 त्या दृष्टीने महत्वाचा आहे. या अनुच्छेदात निवडणूक आयोगाचे कामकाज कसे चालावे, यासंबंधीचे नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. ‘केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्व कामकाज, जितके शक्य आहे, तितक्या प्रमाणात एकमुखाने आणि एकमताने चालले पाहिजे. जर मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन आयुक्त यांच्यात मतभेद निर्माण झाले, तर अंतिम निर्णय तीन्ही आयुक्तांनी बहुमताच्या पद्धतीने घ्यावा.’ असे या कायद्याच्या अनुच्छेद 18(2) मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मुख्य निवडणूक आयुक्त अन्य दोन आयुक्तांना डावलून निर्णय घेऊच शकत नाहीत, हे या अनुच्छेदावरुन स्पष्ट होते, असे आयोगाचे प्रतिपादन आहे.
एसआयआरचा निर्णय एकमुखानेच
मतभेद झाल्यास अंतिम निर्णय बहुमताने घ्यावा, असे कायद्यात स्पष्ट केलेले आहे. तथापि, एसआयआरच्या संदर्भात तिन्ही निवडणूक आयुक्तांमध्ये कोणतीही मतभिन्नता कोणत्याही मुद्द्यावर किंवा कोणत्याही प्रसंगी नव्हती. त्यामुळे हा निर्णय पूर्णत: एकमताने घेण्यात आला आहे, असे स्पष्टीकरणही देण्यात आलेले आहे.
नऊ मुद्द्यांमध्ये आरोपांच्या चिंधड्या
- केंद्रीय निवडणूक आयोग ही घटनानिर्मित आणि स्वायत्त संस्था असून ती घटनेच्या चौकटीत आणि कायद्याने निर्माण केलेल्या नियमांनुसारच काम करते.
- कायद्याप्रमाणे ही संस्था सर्व निर्णय तिन्ही निवडणूक आयुक्तांच्या सहमतीने, संघटितपणे आणि एकमुखाने घेते. यात एकांगीपणाला कोणताही वाव नसतोच.
- कोणताही निर्णय घेतला जात असताना आयुक्तांमध्ये एकमेकांना सूचना देणे, तसेच मतभिन्नता नोंदविणे या प्रक्रिया स्वाभाविकपणेच घडत असतात.
- कोणत्याही परिस्थितीवर अंतिम निर्णय घेताना, मतभेदांचे सर्व मुद्दे विचारात घेऊन त्यांचे पूर्णत: निराकरण करूनच अंतिम निर्णय एकमुखाने घेतला जातो.
- निवडणूक आयोगाचे सर्व प्रशासकीय दिशानिर्देश आणि औपचारिक आदेश यांना केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कायद्याचे पूर्ण कायदेशीर पाठबळ असते.
- निवडणूक आयुक्तांमध्ये होणारे मतभेद हे आयोगाच्या कामकाजात अडथळे निर्माण करण्यासाठी नव्हे, तर मतदाराच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी असतात.
- चर्चा, वादविवाद आणि मतभेदांची अधिकृत नोंद हे कोणत्याही संस्थेच्या कामकाजाचा स्वाभाविक आणि नैसर्गिक भाग असतात, हे काही नवे नाही.
- आयोगावर करण्यात आलेले आरोप बेछूट आणि दिशाभूल करणारे आहेत. ते जनतेच्या मनात संशय निर्माण व्हावा, म्हणून हेतुपुरस्सर केले गेले आहेत.
- केंद्रीय निवडणूक आयोगाने पारदर्शित्वाच्या आणि कायद्याच्या सर्व नियमांचे पालन अत्यंत सजगपणे आणि काटेकोरपणे केलेले असून पुढेही पेले जाईल.
Comments are closed.