162 धावांनी ऑस्ट्रेलियाचा धुव्वा! देवदत्त पडिक्कलच्या नेतृत्वाखाली इंडिया ‘ए’ची दणदणीत विजयी सुरुवात

‘ऑस्ट्रेलिया ए’ (Australia A) संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यात दोन कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामन्यांची (ODI) मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ‘इंडिया ए’ (India A) संघाने शानदार विजय मिळवला. सामन्याच्या चौथ्या दिवशी, दुसऱ्या सत्रात भारताने ‘ऑस्ट्रेलिया ए’चा 162 धावांनी पराभव केला. या विजयासह ‘इंडिया ए’ने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता आणखी एक कसोटी सामना बाकी आहे, त्यानंतर एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होईल.

‘इंडिया ए’ने ‘ऑस्ट्रेलिया ए’ विरुद्धची पहिली कसोटी 162 धावांनी जिंकली. या सामन्यात भारताने पहिल्या डावात 334 धावांची भक्कम धावसंख्या उभारली. त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘ऑस्ट्रेलिया ए’चा पहिला डाव 171 धावांत आटोपला, ज्यामुळे भारताला आघाडी मिळाली. त्यानंतर, ‘इंडिया ए’ने दुसऱ्या डावात 199 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी आव्हानात्मक लक्ष्य ठेवले.

दुसऱ्या डावात ‘ऑस्ट्रेलिया ए’चे फलंदाज अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत. संपूर्ण संघ 200 धावांत बाद झाला. एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. फर्ग्युस ओ नील हा संघाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला, त्याने 52 चेंडूंत 47 धावांची खेळी केली.

‘इंडिया ए’च्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात प्रभावी गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले. तुषार देशपांडे आणि शम्स मुलाणी यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले, तर अंशुल कंबोज आणि तनुष कोटियन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

मालिकेतील दुसरा कसोटी सामना 29 सप्टेंबरपासून पुद्दुचेरी येथे खेळवला जाणार आहे. त्यानंतर, ‘इंडिया ए’ आणि ‘ऑस्ट्रेलिया ए’ यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होईल, जी 6 ऑक्टोबरपासून सुरू होईल.

Comments are closed.