75 धावा, 1 विकेट आणि 4 झेल! मार्को जान्सेनने रचला इतिहास, सचिन तेंडुलकरच्या खास क्लबमध्ये एंट्री

गुरुवारी (24 सप्टेंबर) दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेचा पहिला सामना अत्यंत रोमांचक ठरला. डर्बन येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 67 धावांनी पराभव केला. परिणामी, 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयात मार्को जान्सेनने आपल्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीद्वारे महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रथम फलंदाजी करताना जान्सेनने 75 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना त्याने एक बळी घेतला आणि क्षेत्ररक्षण करताना चार उत्कृष्ट झेल टिपले. या कामगिरीसह त्याने वनडे क्रिकेटच्या इतिहासात एक दुर्मिळ विक्रम नोंदवला असून सचिन तेंडुलकरच्या खास क्लबमध्ये स्थान मिळवले आहे.
एकाच वनडे सामन्यात 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणे, किमान चार झेल घेणे आणि एक बळी मिळवणे अशी कामगिरी करणारा मार्को जान्सेन हा जगातील पाचवा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी केवळ चार खेळाडूंनी ही दुर्मिळ कामगिरी केली होती.
1998 मध्ये ढाका येथे पाकिस्तानविरुद्ध हा टप्पा गाठणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू होता. त्यानंतर युनिस खान (हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध, 2002), मायकल क्लार्क (मेलबर्न येथे भारताविरुद्ध, 2004) आणि मार्नस लबुशेन (नॉटिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध, 20024) यांनी हीच कामगिरी केली होती.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 8 बाद 297 धावा केल्या. ज्यामध्ये मॅथ्यू ब्रिट्झकेने 106 चेंडूंत 112 धावांची खेळी केली, तर मार्को जेन्सनने 59 चेंडूंत 75 धावा ठोकत 107 धावांची भागीदारी केली.
298 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने मिचेल मार्श-ट्रॅव्हिस हेडच्या 90 धावांच्या भागीदारीने चांगली सुरुवात केली. मात्र, त्यानंतर डाव कोलमडला. शेवटचे चार बळी अवघ्या 15 धावांत गमावत ऑस्ट्रेलिया 230 धावांत ऑलआऊट झाला. गोलंदाजीत केशव महाराजने 4 बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेने 67 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
Comments are closed.