याला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्यांची मानसिकता मृत झाली आहे.

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी भारताची आर्थिक वाढ आणि विकासविषयक अंदाजात व मानांकनात अलीकडेच झालेल्या सुधारणांचा उल्लेख करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. भारतीय अर्थव्यवस्थेला ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हणणाऱ्यांवर टीका करताना शहा म्हणाले की, तरीही काही लोक याला ’मृत अर्थव्यवस्था’ मानतात. मी त्यांना सांगू इच्छितो की, ज्यांची स्वत:ची मानसिकता ‘मृत’ असते, त्यांना चैतन्य दिसत नाही, त्यांना त्यांच्या सभोवताली फक्त निर्जीवता दिसते.

‘यूपी इंटरनॅशनल ट्रेड शो 2026’ला संबोधित करताना शहा म्हणाले की, काही लोक भारताच्या ‘जीडीपी’च्या आकडेवारीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी त्यांनी ‘मूडीज’ने भारताच्या विकास दराविषयीचा अंदाज वाढवला आहे, याकडे लक्ष वेधले. ‘मूडीजने भारताच्या विकासदराविषयीचा अंदाज 6 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. जपानची अग्रगण्य रेटिंग एजन्सी जेसीआरने भारताचे सार्वभौम मानांकन सुधारले आहे आणि गेल्या तिमाहीत भारताने 7.8 टक्क्यांचा विकासदर साध्य करून आपली मजबूत गती कायम ठेवली आहे, असे शहा म्हणाले.

केंद्रीय मंत्री असेही म्हणाले की, जागतिक आव्हाने असूनही भारताने आपली वाढ कायम राखली आहे आणि तिला गती दिली आहे. ‘जागतिक गोंधळ, अशांतता आणि असंख्य अडथळे असूनही भारताने आपला विकासदर केवळ टिकवूनच ठेवलेला नाही, तर त्याला अधिक गती दिली आहे. मी जगासमोर पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो की, पंतप्रधान मोदींनी भारताच्या जनतेला दिलेला संकल्प आम्ही पूर्ण करू. त्यानुसार 15 ऑगस्ट, 2047 पर्यंत भारत सर्व क्षेत्रांमध्ये जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर असेल, असे त्यांनी सांगितले.

‘ज्यांचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित आहे त्यांना भारताची प्रगती पाहवत नाही. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केले आहेत. या करारांमुळे आमच्या उद्योगांच्या निर्यात क्षमतेला प्रचंड चालना मिळाली आहे आणि विविध संकटांचा सामना करूनही आम्ही आमची वाढ कायम राखली आहे’, असे शहा म्हणाले.

उत्तर प्रदेशात तयार होणाऱ्या ब्राह्मोस क्षेपणास्त्रांमुळे पाकची झोप उडाली

अमित शहा यावेळी म्हणाले की, उत्तर प्रदेशात होणारे संरक्षण उपकरणांचे उत्पादन हे राज्यात आणि संपूर्ण भारतात होत असलेल्या परिवर्तनाचे लक्षण आहे. तसेच उत्तर प्रदेशात तयार होणारी ब्रह्मोस क्षेपणास्त्रs पाकिस्तानची झोप उडवत आहेत. त्याचप्रमाणे अमेठीमध्ये बनवल्या जाणाऱ्या एके-203 असॉल्ट रायफल्स नक्षलवादी आणि दहशतवादी या दोघांचीही झोप उडवत आहेत, असा दावाही त्यांनी केला.

Comments are closed.