आम्ही 3 अटींसह 7 दिवसांत होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यास तयार; निर्णय अमेरिकेने घ्यावा, इराणची खुली ऑफर
आखातामध्ये गेल्या आठ महिन्यांपासून तणाव आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे होर्मुझची सामुद्रधुनी ठप्प झाला आहे. तेल वाहतुकीसाठी महत्त्वाचा असणारा हा सागरी मार्ग बंद झाल्याने जगाच्या तेल आणि नैसर्गिक गॅस पुरवण्यावर विपरीत परिणाम झाला आहे. अनेक जहाजांवर हल्ले झाल्याने तेल वाहतूक करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे, मात्र यामुळे खर्च वाढतोय. यावर आता तोडगा काढण्यासाठी इराणने अमेरिकेपुढे एक प्रस्ताव ठेवला आहे.
आपल्या तीन अटी अमेरिकेने मान्य केल्या तर सात दिवसांच्या आत होर्मुझची सामुद्रधुनी खुली करू, असे इराणने स्पष्ट केले आहे. तसेच अणुऊर्जा कार्यक्रमावरील चर्चा पुन्हा सुरू होईल, असे संकेतही इराणने दिले आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी कतारच्या मध्यस्थीने हा प्रस्ताव अमेरिकेकडे पाठवला असून आता अंतिम निर्णय अमेरिकेला घ्यायचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इराणच्या तीन अटी
होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणने अमेरिकेपुढे तीन अटी ठेवल्या आहेत. यात अटी मान्य केल्या तर सात दिवसात होर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करू असे इराणने म्हटले आहे. इराणने अमेरिपुढे ठेवलेल्या अटी खालील प्रमाणे आहेत
1. इराणी बंदरांवर लादलेली अमेरिकन नौदलाची नाकेबंदी तातडीने उठवण्यात यावी.
2. इराणच्या कच्च्या तेलाच्या विक्रीवर अमेरिकेने लादलेल्या आर्थिक निर्बंधांमध्ये सूट देण्यात यावी.
3. लेबनानचाही समावेश करून पूर्ण युद्धविराम लागू करण्यात यावा.
स्पर्धा हवी, पण कुस्ती नको! अमेरिका-चीन संबंधांवर शी जिनपिंग यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा
अमेरिकेला या अटींची पूर्तता करण्यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागेल. अमेरिकेने होकार देताच सहाव्या दिवशी होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाईल आणि सातव्या दिवशी दोन्ही देशांमध्ये पुन्हा अधिकृत चर्चा सुरू होईल, असे इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची म्हणाले.
शी जिनपिंग आणि ट्रम्प यांच्यातही चर्चा
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्य शी जिनपिंग यांच्यातील बैठकीतही मध्य पूर्वेतील युद्धाचा मुद्दा उपस्थित झाला. शी जिनपिंग यांनी ट्रम्प यांना इराणसोबतच्या जुन्या करारावर परतण्याचे आवाहन केले आहे. चिनी अर्थव्यवस्थेसाठी या सागरी मार्गावरून होणारा तेल पुरवठा अत्यंत महत्त्वाचा असल्याने बीजिंग या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी चीनच्या या पाठिंब्याचे स्वागत केले आहे.
तेल वाहतुकीवर परिणाम
युद्ध सुरू होण्यापूर्वी जगातील एकूण 20 ते 25 टक्के तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक होर्मुझची सामुद्रधुनी या सागरी मार्गावरून होत होती. मात्र युद्धामुळे हा मार्ग ठप्प झाला असून कच्च्या तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. याचा परिणाम जगभरातील राष्ट्रांवर होत असून पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमती वाढत आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.
Comments are closed.