मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि SIR विरोधात शिवसेना-मनसेचा 4 ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा
केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील रोष वाढत चालला आहे. देशभरातील विरोधी पक्षांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच एसआयआरच्या आडून कोट्यवधी मतदारांचे नाव वगळण्यात आल्याचेही समोर आले आहे. याविरोधात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईत येत्या 4 ऑक्टोबर रोजी मोर्चा काढणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट लिहून याबाबत माहिती दिली आहे.
राज ठाकरे यांनी शनिवारी समाजमाध्यमावर पोस्ट करत मोर्चाची माहिती दिली. देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण शाखाच आहोत अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची जी घोर फसवणूक केली आहे त्याविरोधात मनसे आणि शिवसेना येत्या 4 ऑक्टोबर 2026 ला मुंबईत एक जनमोर्चा काढणार आहे.
मोर्चाच्या आयोजनात जरी मनसे आणि शिवसेनेचा पुढाकार असला तरी हा जनतेचा मोर्चा आहे आणि हा एका पक्षापुरता न राहता तो तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षांना या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी संवाद साधणार आहोत. अर्थात महाराष्ट्रातील जनतेलाच आवाहन आहे की आपण मोठ्या संख्येने या मोर्च्यात सहभागी व्हा, असे राज ठाकरे म्हणाले.
तसेच मोर्च्याची वेळ आणि ठिकाण लवकरच कळवण्यात येईल. तेव्हा एसआयआरविरोधातील या जनमोर्च्यात भेटूया ! या, देशातील लोकशाही आणि या देशाचे संविधान वाचवण्यासाठी एकत्र या ! असे आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केले.
प्रेमाने जय महाराष्ट्र,
देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण शाखाच आहोत अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची जी घोर फसवणूक केली आहे त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना येत्या ४ ऑक्टोबर…— राज ठाकरे (@RajThackeray) 26 सप्टेंबर 2026
Comments are closed.