Ratnagiri News – रत्नागिरी जिल्ह्यातील तीन तालुक्यात दुष्काळ, शेतकरी चिंतेत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने 25 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार, सन 2026 च्या खरीप हंगामात पावसाची तूट आणि इतर घटकांमुळे राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती निश्चित केली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या 3 तालुक्यांचा यात समावेश आहे. या तीनही तालुक्यात 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे.

शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना या बाधित तालुक्यांमध्ये तातडीने पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पंचनाम्यांचे काम विनाविलंब सुरू करण्यात यावे. सर्व्हेक्षण केलेल्या भागातील पिकांची खरी स्थिती दर्शवणारे छायाचित्रे व जीपीएस कोऑर्डिनेट्स गोळा करण्यात यावेत. पीक परिस्थितीचा हा वस्तुनिष्ठ अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाकडे तात्काळ सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यातील 265 दुष्काळग्रस्त तालुक्यांसह रत्नागिरीतील या 3 तालुक्यांसाठी शासनाने पुढील सवलती लागू केल्या आहेत. त्यामध्ये जमीन महसुलात पूर्ण सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित सर्व प्रकारच्या कर्ज वसुलीस तात्पुरती स्थगिती, वीज बिल माफी व जोडणी संरक्षण, 7.5 हॉर्सपावरपेक्षा जास्त क्षमतेच्या कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट देण्यात आली आहे. 7.5 एचपी पर्यंतची बिले आधीच मोफत आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज तोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

बाधित भागातील सर्व शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले जाईल. रोजगार हमी योजनेच्या कामांचे निकष शिथिल करून जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करणे आणि टंचाईग्रस्त भागात टँकरने पिण्याचे पाणी पुरवणे. जनावरांसाठी आवश्यक चारा आणि पाण्याचे नियोजन करणे, अन्नधान्याची टंचाई भासू न देणे तसेच जलसंधारणाची कामे प्राधान्याने सुरू करणे. बाधित शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पीक नुकसानीची आर्थिक भरपाई ही पंचनाम्यांची विहित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे घोषित केली जाईल.

Comments are closed.