मणिपूरमध्ये AFSPA चा विस्तार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मणिपूर, नागालँडचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेशचा काही भाग येथे ‘आफ्स्पा’ कायद्याला सहा महिन्यांची कालावधीवाढ देण्यात आली आहे. या भागांमधील परिस्थिती पाहता अद्याप तेथे आफ्स्पाची आवश्यकता आहे, असे हा निर्णय घोषित करताना केंद्र सरकारने शनिवारी स्पष्ट केले. या कायद्याच्या अंतर्गत मणिपूर हे संपूर्ण राज्य ‘उपद्रवग्रस्त’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. मणिपूरमधील इंफाळ खोऱ्यातील 13 पोलीस स्थानकांच्या कार्यकक्षेतील प्रदेश मात्र, आफ्स्पा कायद्याच्या कार्यान्वयनापासून मुक्त ठेवण्यात आला आहे. नागालँडच्या 8 जिल्ह्यांमध्ये, तसेच आणखी पाच जिल्ह्यांच्या एकंदर 21 पोलिस स्थानकांच्या कार्यकक्षांमध्ये आफ्स्पा आणखी सहा महिन्यांसाठी लागू राहणार आहे. तसेच अरुणाचल प्रदेशातही सध्या ज्या भागांना आफ्स्पा लागू आहे, त्या भागांमध्ये तो आणखी सहा महिने लागू राहणार आहे. परिस्थितीचा आढावा याच कायद्याच्या तरतुदींच्या अनुसार प्रत्येक सहा महिन्यांनी घेतला जातो. आवश्यकता असल्याचे त्याच्या कार्यान्वयनाला कालावधीवाढ दिली जाते. या तीन राज्यांमच्या उपद्रवगस्त भागांमधील स्थिती अद्याप सुधारलेली नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.
Comments are closed.