कला सरोवर

भारत हा विविध प्रकारांच्या सरोवरांचा देश म्हणून प्रसिद्ध आहे. विशेषत: हिमालयाच्या परिसरातील सरोवरे तर नितांत सुंदर असून ती पाहण्यासाठी भारतातून, तसेच जगातूनही लक्षावधी पर्यटक येत असतात. पण सर्वच सरोवरे अशी सुप्रसिद्ध नाहीत. काही कुप्रसिद्ध सरोवरेही आहेत. भारत आणि म्यानमार या देशाच्या सीमांवर असणारे एक सरोवर असे कुप्रसिद्ध आहे. ते भारताचा ‘बर्म्युडा त्रिकोन’ म्हणून ओळखले जाते. कारण या सरोवरात जो जाईल, तो कधीही परत येत नाही, असे या सरोवराचे वैशिष्ट्या आहे. तांत्रिकदृष्ट्या पाहिले असता हे सरोवर भारतात नाही. तर ते भारत आणि म्यानमारच्या सीमेवर म्यानमारच्या बाजूला आहे. तरीही ते भारताचेच मानले जाते. कारण भारतातून तेथे जाणाऱ्या पर्यटकांनी संख्या अधिक आहे. त्याचे नावही त्याच्या या ख्यातीला शोभेसे, ‘लेक ऑफ नो रीटर्न्स’ किंवा ‘कालसरोवर’ असेच आहे. त्याला ‘नावांग यांग सरोवर’ या नावानेही ओळखले जाते. ते पांगसाऊ खिंडीच्या जवळ असून भारतातील अरुणाचल प्रदेश या राज्यातील चांगलांग जिल्ह्यातून दिसू शकते. त्याला ‘कालसरोवर’ असे का म्हणतात, असा प्रश्न विचारला जातो. यासंबंधी अनेक खऱ्या किंवा दंतकथा प्रसिद्ध आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला जपानने म्यानमारवर हल्ला करुन तो जवळपास ताब्यात घेतला होता. त्यावेळी काही जपानी सैनिक वाट चुकून या सरोवरानजीक आले. या सरोवरातील पाणी प्यायल्यानंतर ते सैनिक आजारी पडले आणि नंतर सर्वांचा मृत्यू झाला, अशी कथा आहे. तेव्हापासून या सरोवराला ‘लेक ऑफ नो रीटर्न्स’ असे संबोधले जाऊ लागले. एक भारतीय लोककथाही आहे. या सरोवरात एक मोठा मासा पकडण्यात आला आणि मासा पकडणाऱ्यांना साऱ्या गावाला मेजवानीसाठी बोलाविले. मात्र एक वृद्ध महिला आणि तिच्या नातीला बोलाविण्यात आले नाही. मेजवानीनंतर हे संपूर्ण गाव पाण्याखाली बुडून गेले, अशी ही कथा आहे. ती शेकडो वर्षांपासून प्रचलित आहे.

Comments are closed.