Photo – भक्तांच्या अलोट गर्दीत बाप्पाला निरोप

सर्व फोटो – चंद्रकांत पालकर

डोळ्यांत भाव, मनात भक्ती आणि मुखामुखातून एकच जयघोष ‘गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या !…’, ‘गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला…’ लाडक्या बाप्पाला पुण्यात वैभवशाली विसर्जन मिरवणुकीने वाजत-गाजत निरोप देण्यात आला आणि 12 दिवस अखंडपणे सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता झाली.

शुक्रवारी सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांनी सुरू झालेली मिरवणूक ३४ तास ५२ मिनिटांनी संपली. शेवटच्या गणपतीचे विसर्जन शनिवारी रात्री ७.३३ वाजता झाले.

सनई-चौघाड्यांचे मंगलसूर, ढोल ताशांचा गजर, झाज, लेझीम, टिपऱ्या, बँडवर वाजणाऱ्या गाण्यांची धून, रांगोळ्यांच्या पायघड्या, लक्षवेधक चौकाचौकात रेखाटलेले देखावे, गुलालाची मुक्त उधळण… अशा दिमाखात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीचा मार्ग सजविण्यात आला होता.

रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. बाप्पाचे विलोभनीय रूप डोळ्यांत साठविण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू होती. प्रसन्न सकाळी आबालवृद्ध रस्त्यावर गर्दी करू लागले.

दुपारीही घरगुती गणपतीचे वाजत-गाजत विसर्जन सुरू होते, ते झाल्यानंतर भक्तांनी लक्ष्मी रस्त्याने निघालेल्या भव्य मिरवणुकीकडे गर्दी केली.

ढोल-ताशा पथकांचे चौकाचौकात होणारे लक्षवेधक वादन आणि त्यावर ताल धरणारे नागरिक असं चित्र दुपारी तर सूर्यास्तानंतर डीजेचा दणदणाट आणि त्यावर थिरकणारी तरुणाई मनसोक्त आनंद घेताना दिसली.

मिरवणुकीत सहभागी झालेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या ‘विघ्नहर्ता रथा’ने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. हा रथ बेलबाग चौकात दाखल होताच गणेशभक्तांनी ‘मोरया मोरया… गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष केला.

प्रचंड गर्दी असणाऱ्या रस्त्यावरून अवघ्या काही क्षणांमध्ये रुग्णवाहिकेसाठी मार्ग मोकळा करण्यात आला.

Comments are closed.