IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध मैदानात उतरताच किंग कोहलीने रचला इतिहास! या माजी कर्णधाराचा 28 वर्षे जुना विक्रम उध्वस्त

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज दोन्ही संघांमध्ये 3 वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली असून, या सामन्यात किंग कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये एका खास विक्रमासह पुनरागमन केले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध तिरुवनंतपुरम येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या वनडेत मैदानात उतरताच कोहलीने माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन (Mohmmed Ajhruddin) यांचा 28 वर्षे जुना विक्रम मोडला. आता वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेत भारताकडून सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोहली ठरला आहे. 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात मैदानात उतरताच त्याने ही कामगिरी केली आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज, 27 सप्टेंबर रोजी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर सामना खेळला जात आहे. वेस्ट इंडिजविरुद्धचा हा कोहलीचा 44वा वनडे सामना आहे. याआधी भारताकडून या संघाविरुद्ध सर्वाधिक वनडे सामने खेळण्याचा विक्रम अझरुद्दीन यांच्या नावावर होता. त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 43 सामने खेळले होते.

भारताकडून वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक वनडे सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कपिल देव (Kapil Dev) 42 सामन्यांसह तिसऱ्या, राहुल द्रविड (Rahul Dravid) 40 सामन्यांसह चौथ्या आणि एमएस धोनी (MS Dhoni) 39 सामन्यांसह पाचव्या क्रमांकावर आहेत. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनीही वेस्ट इंडिजविरुद्ध 39 वनडे सामने खेळले आहेत.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार शिवनारायण चंद्रपॉल यांच्या नावावर आहे. त्यांनी 1994 ते 2009 या काळात भारताविरुद्ध एकूण 46 वनडे सामने खेळले होते. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये कोहली मैदानात उतरला, तर तो चंद्रपॉल यांच्या विक्रमाची बरोबरी करेल.

वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक वनडे सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियांदाद आणि वसीम अक्रम संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत. दोघांनीही वेस्ट इंडिजविरुद्ध प्रत्येकी 64 वनडे सामने खेळले आहेत.

कोहलीसाठी हा सामना केवळ विक्रमापुरता मर्यादित नाही. त्याच्याकडे फलंदाजीतही इतिहास रचण्याची संधी आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध कोहलीने आतापर्यंत 9 वनडे शतके झळकावली आहेत. पहिल्याच सामन्यात त्याने शतक झळकावले, तर वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेत 10 शतके करणारा क्रिकेट इतिहासातील पहिला खेळाडू ठरेल.

याशिवाय कोहली वनडे क्रिकेटमध्ये 15 हजार धावा पूर्ण करण्यापासून केवळ 59 धावा दूर आहे. त्याच्या नावावर 314 वनडे सामन्यांत 14,941 धावा आहेत. पहिल्या वनडेत त्याने 59 धावा केल्या, तर या फॉरमॅटमध्ये 15 हजार धावा पूर्ण करणारा तो जगातील केवळ दुसरा फलंदाज ठरेल. त्याच्याआधी ही कामगिरी फक्त सचिन तेंडुलकर यांनी केली आहे.

Comments are closed.