Ratnagiri News – देवरुख एसटी आगारातील सुलभ शौचालयाची दयनीय अवस्था; दुर्गंधीमुळे प्रवाशांचे हाल; आगार प्रशासनाचे दुर्लक्ष की अनास्था ?
संगमेश्वर तालुक्यातील देवरुख एसटी आगारातील प्रवाशांसाठी असलेल्या सुलभ शौचालयाची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. शौचालयाच्या अस्वच्छतेमुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून, या परिस्थितीमुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे.
देवरुख एसटी आगारातील शौचालयामध्ये दोन प्रसाधनगृहाचे दरवाजे तुटलेले आहेत. त्यापैकी एक प्रसाधनगृह बंद करून ठेवण्यात आले आहे, तर उपलब्ध असलेल्या दोन्ही प्रसाधन गृहाची अवस्था देखील चिंताजनक आहे. दोन्ही प्रसाधन गृह भरलेले असून त्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे.एसटीने प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांसाठी सार्वजनिक शौचालय ही अत्यावश्यक सुविधा आहे. मात्र, शौचालयाची अशी अवस्था असल्याने प्रवाशांना नाईलाजाने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
शौचालयाची नियमित स्वच्छता का केली जात नाही? तुटलेले दरवाजे दुरुस्त का केले जात नाहीत? तसेच भरलेले टॉयलेट वेळेत साफ करून वापरण्यायोग्य का ठेवले जात नाहीत? असे प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केले जात आहेत. या गंभीर समस्येकडे देवरुख एसटी आगार प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन दोन्ही टॉयलेटची साफसफाई, भरलेली व्यवस्था रिकामी करणे, तुटलेले दरवाजे दुरुस्त करणे, बंद असलेले टॉयलेट पुन्हा वापरासाठी खुले करणे तसेच नियमित स्वच्छता व देखभालीची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
“एसटी आगारात येणाऱ्या प्रवाशांना किमान स्वच्छ आणि वापरण्यायोग्य शौचालयाची सुविधा मिळणे अपेक्षित आहे. सध्या देवरुख आगारातील शौचालयाची अवस्था पाहता प्रशासनाने तातडीने याची दखल घेणे गरजेचे आहे. प्रवाशांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न असल्याने केवळ तात्पुरती साफसफाई न करता कायमस्वरूपी देखभालीची व्यवस्था करण्यात यावी,” अशी मागणी समाजसेवक व प्रवासी अजित गोरुले यांनी केली आहे.प्रवाशांच्या या समस्येची दखल घेऊन देवरुख एसटी आगार प्रशासन तातडीने कार्यवाही करणार का, याकडे आता प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.