परवडणाऱ्या योजना आता फक्त कॉलिंगसाठी उपलब्ध आहेत.

मोबाईल रिचार्जसाठी 28 ऐवजी पूर्ण 30-दिवसांचे प्लॅन्स उपलब्ध होणार : राघव चड्ढा यांची माहिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतातील लाखो प्रीपेड मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक मोठी बातमी आली आहे. आता दर 28 दिवसांनी फोन रिचार्ज करण्याच्या त्रासातून मुक्ती मिळेल. केंद्र सरकारने दूरसंचार ग्राहक संरक्षण (13 वी सुधारणा) विनियम, 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमानुसार, दूरसंचार कंपन्यांना आता पूर्ण 30 दिवसांच्या वैधतेचे प्लॅन्स देणे बंधनकारक असेल. आता, या नवीन नियमांच्या अंमलबजावणीमुळे ग्राहकांना अधिक पर्याय आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध होतील.

भाजपचे खासदार राघव चड्ढा यांनी संसदेत उचलून धरलेली मागणी अखेर केंद्र सरकार आणि टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (टीआरएआय) मान्य केली आहे. राघव चड्ढा यांनी या निर्णयाची माहिती रविवारी ‘एक्स’वरून शेअर करत आपला आनंद व्यक्त केला. नव्या नियमांनुसार आता टेलिकॉम कंपन्यांना ग्राहकांसाठी पूर्ण 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीचे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आल्यामुळे यूजर्सना आता वर्षातून 13 वेळा नाही तर केवळ 12 वेळाच मोबाईल रिचार्ज करावा लागणार आहे. याव्यतिरिक्त ज्यांना डेटाची आवश्यकता नाही त्यांच्यासाठी व्हॉइस आणि एसएमएस प्लॅनचे पर्याय देखील उपलब्ध असतील.

कंपन्यांवर दडपण

राघव चड्ढा यांनी 11 मार्च रोजी संसदेत दूरसंचार कंपन्यांच्या ‘28 दिवसांच्या गणिता’चा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला होता. ग्राहकांसाठी मर्यादित पर्याय उपलब्ध असल्याबद्दल लोकांनी त्यांच्या चिंता त्यांच्यासमोर मांडल्या होत्या. एअरटेल, जिओ, व्होडाफोन आणि बीएसएनएल सारख्या टेलिकॉम कंपन्यांना आता महागड्या इंटरनेट डेटा शुल्काशिवाय परवडणारे व्हॉइस आणि एसएमएस प्लॅन्स देणे बंधनकारक असेल. यामुळे परवडणाऱ्या मोबाईल सेवा शोधणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

राघव चड्ढा यांनी मानले ‘ट्राय’चे आभार

आपल्या पोस्टमध्ये, खासदार चड्ढा यांनी भारत सरकार आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) यांचे आभार मानले. ग्राहकांसाठी मर्यादित पर्याय उपलब्ध असल्याबद्दल लोकांनी आपल्या चिंता त्यांच्यासमोर मांडल्या होत्या, असे त्यांनी म्हटले आहे. या नवीन नियमांच्या अंमलबजावणीमुळे ग्राहकांना अधिक पर्याय आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध होतील. ट्रायच्या प्रक्रियेदरम्यान ग्राहक आणि दूरसंचार उद्योगासह विविध हितधारकांकडून या विषयावर सूचनाही घेण्यात आल्या होत्या.

ग्राहकांना होणारे लाभ

आता वर्षात 13 ऐवजी 12 रिचार्ज : 28 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनसाठी कंपन्यांना वर्षाला एका अतिरिक्त महिन्याचे शुल्क आकारले जात असे. 30 दिवसांच्या या चक्रामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील अनावश्यक भार लक्षणीयरीत्या कमी होईल.

केवळ ‘व्हॉइस आणि एसएमएस‘ प्लॅन्स : नवीन नियम लागू करून सरकारने आणि ट्रायने क्वचितच रिचार्ज करणाऱ्या, जास्त इंटरनेटची आवश्यकता नसणाऱ्या आणि फक्त बेसिक कॉलिंग वापरणाऱ्या लोकांची विशेष काळजी घेतली आहे.

Comments are closed.