Ratnagiri News -संगमेश्वर तालुक्यात ऑनलाइन पीक पाहणीच्या नोंदणीत अडचणी; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पीक पाहणीतील अडचणींनी शेतकरी त्रस्त
संगमेश्वर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला असून, पिकांना जगवताना शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच शासनाच्या ऑनलाइन पीक पाहणी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. सर्वे नंबर उपलब्ध असूनही ऑनलाइन प्रणालीमध्ये संबंधित सातबारा चुकीचा दाखवला जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत.
संगमेश्वर तालुक्यात यावर्षी सुमारे ८ हजार २८२ हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली आहे. हे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास स्थिर आहे. याशिवाय यावर्षी नाचणीचे क्षेत्र १२०.७६ हेक्टर झाले असून, गेल्या वर्षी हे क्षेत्र सुमारे १०० हेक्टर होते. त्यामुळे नाचणीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.शेतकऱ्यांना पीक पाहणी ऑनलाइन पद्धतीने नोंदविताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. सर्वे नंबर टाकल्यानंतर चुकीचा सातबारा दिसणे, पीक नोंदणी करताना अडथळे येणे तसेच ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण न होणे यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाया जात आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत पीक पाहणीची नोंद अचूक होणे महत्त्वाचे असताना ऑनलाइन प्रणालीतील त्रुटींमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
ऑनलाइन पीक पाहणी करताना अनेक अडचणी येत असून, प्रत्यक्ष शेतातील पीक आणि ऑनलाइन नोंद यामध्ये तफावत निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने तातडीने या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी शेतकरी बंड्या लिंगायत यांनी केली.दरम्यान, ऑनलाइन पीक पाहणीऐवजी आवश्यकतेनुसार ऑफलाइन पीक पाहणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रगतिशील शेतकरी रवींद्र उर्फ नाना हळबे यांनी केली आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने पीक पाहणी प्रक्रिया सुलभ करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Comments are closed.