बंदुकीची गोळी सुटून एकाचा मृत्यू, एक जण जखमी; दापोली तालुक्यातील कोंढारवाडी येथील घटना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिकारीला गेले असता बंदुकीची गोळी लागून एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. दापोली तालुक्यातील दाभोळजवळील वणोशी कोंढारवाडी येथे गुरुवारी पहाटे ही घटना घडली. सचिन शिगवण (42) असे मयताचे तर सुनील पांदले (46) असे जखमीचे नाव आहे. जखमीला उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दाभोळ पोलीस स्थानकात बीएनएसएस 194 अन्वये अकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील दाभोळ जवळील वणोशी कोंढारवाडी येथील सुनील पांदले आणि सचिन शिगवण हे दोघे शिकारीसाठी गावातील धारेजवळ येथे गेले होते. त्यांच्याकडे सिंगल बोअरची बंदूक होती. धारेजवळ एका ठिकाणी ते सावजाची वाट पाहत दबा धरून बसले होते. यावेळी सचिन शिगवण याचा पाय बंदुकीला लागला व बंदुकीचा चाप ओढला गेला. यामुळे ट्रिगर दबला गेला व सचिन शिगवण याच्या शरीरात बंदुकीतील सहा छरे घुसले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर बाजूला बसलेला सुनील पांदले याच्या पायाला व मांडीला छडे घुसून जबर दुखापत झाली.
यामुळे सुनील पांदले हा जागीच बेशुद्ध पडला.

शुद्ध आल्यावर त्याने आपला मित्र विन्या पारदले याला फोन करून घडला प्रकार सांगितला. यानंतर पारदले याने तातडीने घटनास्थळी धाव घेत पांदले याला अधिक उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

सदर घटना कळताच दाभोळ सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा केला. सचिन शिगवण याचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. सचिन शिगवण हा व्यवसायाने रिक्षा चालक होता. त्याच्या पश्चात बायको, एक मुलगा असा परिवार आहे तर सुनील पांदले हा मजुरी करतो. या घटनेमुळे दापोली तालुक्यातील चोरट्या शिकारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. या चोरट्या शिकाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.

Comments are closed.