जेन झीचा उल गुलान मोर्चा मुंबईच्या वेशीवर; आश्रमशाळांमधील प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी राजभवनावर धडक, आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

निकृष्ट भोजन, पायाभूत सुविधांचा अभाव तसेच आश्रमशाळांच्या अन्य प्रलंबित मागण्यांसाठी निघालेला जेन झीचा उल गुलान मोर्चा आज मुंबईच्या वेशीवर धडकला. कसारा येथे मुक्कामी असलेले शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उद्या पुन्हा सकाळी मुंबईच्या दिशेने रवाना होणार असून ५ ऑक्टोबर रोजी राजभवनावर घडकणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे कानाडोळा करणाऱ्या आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिला आहे.

आश्रमशाळांमधील पायाभूत सुविधांसाठी गेल्या ४२ दिवसांपासून नाशिक येथे आंदोलन सुरू होते. मात्र त्याची सरकारने साधी दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी २८ सप्टेंबरपासून नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढला आहे. हा मोर्चा आज कसारा घाटातून उतरून सायंकाळी कसारा येथे मुक्कामी आला. यावेळी आंदोलकांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणारे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

तसेच आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये निकृष्ट भोजन दिले जात असल्याने मध्यवर्ती किचन बंद करावे, आश्रम शाळेतच मुलांना ताजा व सकस आहार द्यावा. नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळेमध्ये साप चावून मृत्यू झालेल्या विद्यार्थिनींच्या कटुंबांना एक कोटी रुपयांची मदत द्यावी, अशी मागणीदेखील मोर्चेकऱ्यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

मोर्चात १८ ते २० वर्ष वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले असून शेकडो विद्यार्थी अल्पवयीन असल्याने त्यांची प्रकृती बिघडत आहे. इगतपुरी ते कसारादरम्यान चार मुली व तीन मुलांना चक्कर आली. त्यातील एक विद्यार्थिनी बेशुद्ध पडली. याबाबत माहिती मिळताच इगतपुरी व कसारा वैद्यकीय पथकाने या विद्यार्थ्यांवर उपचार केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. मात्र या बैठकीत सकारात्मक चर्चा न झाल्याने राजभवनावर धडकणार आहोत.

राहुल पावरा, आंदोलक विद्यार्थी

Comments are closed.