Asian Games 2026 – कांस्यपदक काढून घेतलं, 22 महिन्यांची बंदी घातली, ऑलिम्पिकलाही मुकली; आता परवीनने ठोकला सुवर्ण ‘पंच’!
हरियाणाच्या रोहतक येथील एका सामान्य कुटुंबातून आलेल्या परवीन हुडा हिने 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानासाठी सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. 65 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत तिने तैपेईच्या बॉक्सरचा 3-2 असा रोमहर्षक पराभव केला. या चुरशीच्या लढतीत पहिल्या फेरीत चांगली कामगिरी केल्यानंतर, दुसऱ्या फेरीत प्रतिस्पर्धी खेळाडूने पुनरागमन केले होते. मात्र, परवीनने अत्यंत संयम राखत तिसऱ्या आणि अंतिम फेरीत मुक्क्यांचा जोरदार मारा केला आणि सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.
परवीनने यापूर्वी 2023-24 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले होते, मात्र डोपिंग चाचणीदरम्यान आपले ठिकाण उघड न केल्याच्या तांत्रिक कारणावरून तिच्यावर 22 महिन्यांची बंदी घालण्यात आली आणि तिचे पदकही काढून घेण्यात आले. या धक्क्यामुळे ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती. मात्र मानसशास्त्रज्ञाची मदत, नियमित ध्यान आणि कठोर परिश्रमाच्या बळावर तिने पुन्हा एकदा रिंगमध्ये दमदार पुनरागमन केले.
परवीनसाठी हा प्रवास मुळातच अतिशय खडतर होता. तिचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत असून, घरातील शेतजमीन नापीक असल्याने सुरुवातीला तिच्याकडे बॉक्सिंगचे हातमोजे खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते. 2011 मध्ये गावातील प्रमुख सुधीर हुडा यांनी सुरू केलेल्या बॉक्सिंग अकादमीत तिने मेरी कोम आणि विजेंदर सिंग यांच्यापासून प्रेरणा घेऊन खेळाची सुरुवात केली. तिच्या प्रशिक्षकाने तिला सुरुवातीला हातमोजे आणि बूट उपलब्ध करून दिले. घरच्यांची बिकट परिस्थिती आणि वडिलांचा सुरुवातीला असलेला विरोध या सर्व आव्हानांवर मात करत आईच्या खंबीर पाठिंब्यामुळे तिने आपले स्वप्न साकार केले आहे. आता या सुवर्णपदकासह तिने हिंदुस्थानच्या मान जगात उंचावली आहे.
Comments are closed.