क्रिकेटविश्वात खळबळ! ख्रिस गेलचा ‘तो’ विक्रम अखेर मोडला, 20 वर्षीय खेळाडूची 188 धावांची खेळी

दक्षिण आफ्रिकेच्या देशांतर्गत टी-20 लीगमध्ये नाबाद 188 धावांची खेळी करत लुआन-द्रे प्रिटोरियसने इतिहास घडवला. या खेळीसह त्याने टी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा जागतिक विक्रम आपल्या नावे केला. गेल्या 13 वर्षांपासून हा विक्रम युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलच्या नावावर होता. गेलने 2013 च्या आयपीएलमध्ये ‘पुणे वॉरियर्स इंडिया विरुद्ध नाबाद 175 धावा केल्या होत्या. आता गेलचा हा विक्रम मोडीत काढत प्रिटोरियसने टी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

शुक्रवारी झालेल्या देशांतर्गत सीएसए (CSA) टी-20 चॅलेंज सामन्यात नाईट्स विरुद्ध टायटन्स या दक्षिण आफ्रिकन संघाकडून खेळताना, लुआन-द्रे प्रिटोरियसने 79 चेंडूत नाबाद 188 धावा केल्या. या खेळीदरम्यान प्रिटोरियसने 13 षटकार आणि 15 चौकार लगावले. मात्र, द्विशतक हुकल्याची खंत त्याला नक्कीच वाटली असेल; जर त्याला आणखी एक षटक खेळायला मिळाले असते, तर त्याने कदाचित आणखी एक मोठा टप्पा गाठला असता.

प्रिटोरियसच्या या दमदार खेळीच्या जोरावर टायटन्सने एकूण 267 धावांचा डोंगर उभारला. हा 20 वर्षीय डावखुरा फलंदाज सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकत्याच नामिबिया, झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिरंगी मालिकेत 53 चेंडूत 101 धावांची शानदार खेळी केली होती.

प्रिटोरियसने आपल्या खेळीची सुरुवात आक्रमकपणे केली. त्याने अवघ्या 24 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर शतक गाठण्यासाठी त्याला केवळ आणखी 16 चेंडू लागले. पुढे त्याने 58 चेंडूत 150 धावांचा टप्पा गाठला.

पुरुष टी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येबाबत प्रिटोरियसने ॲरॉन फिंच आणि मार्कस स्टॉइनिस यांच्या विक्रमाशी बरोबरीही केली. प्रिटोरियसच्या शानदार खेळीच्या जोरावर, टायटन्सने 3 बाद 267 धावांची मजल मारली. सीएसए टी20 चॅलेंजच्या (CSA T20 Challenge) इतिहासातील ही संघाची दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी, 2022 मध्ये याच संघाविरुद्ध टायटन्सने 3 बाद 271 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात डेवाल्ड ब्रेविसने 162 धावा केल्या होत्या, जी सीएसए टी20 चॅलेंजमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती; मात्र, आता तो विक्रम प्रिटोरियसच्या नावावर जमा झाला आहे.

Comments are closed.