अमेरिकेत स्वामीनारायण मंदिरावर हल्ला; खिडक्यांच्या काचा फुटल्या
अमेरिकेतील ओहायो राज्यातील ग्रेटर क्लीव्हलँड परिसरातील श्री स्वामीनारायण वडतलधाम हिंदू मंदिरावर अज्ञात समाजकंटकांनी विटा फेकून हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दगडफेकीत मंदिराच्या खिडक्यांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले आहे. घटनेच्या वेळी मंदिरात पुजारी आणि भाविक उपस्थित होते, अशी माहिती ‘कोएलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका’ (कोहना) या संस्थेने दिली आहे.
‘हिंदू अमेरिकन फाऊंडेशन’ने ‘एक्स’वर दिलेल्या माहितीनुसार, एक किंवा त्याहून अधिक समाजकंटकांनी मंदिराच्या इमारतीवर विटा भिरकावल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून स्थानिक पोलीस त्याचा तपास करत आहेत. तसेच एफबीआय आणि नागरी हक्क प्राधिकरणाशी संपर्क साधण्यात आला असून त्यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. सध्या अमेरिकेतील हिंदू समुदायाविरोधात द्वेष पसरवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच हा संभाव्य ‘हेट क्राइम’चा प्रकार घडला आहे, असे नमूद करत प्रशासनाने हल्लेखोरांना तातडीने अटक करावी, अशी मागणी ‘एचएएफ’ने केली आहे. दरम्यान, पोलिसांनी अद्याप कोणत्याही संशयिताची ओळख जाहीर केलेली नसून कोणालाही अटक केलेली नाही. नवरात्रोत्सवाचीही तयारी सुरू असतानाच ही घटना घडल्याने स्थानिक हिंदू समुदायामध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. यापूर्वी ऑगस्ट 2022 मध्ये न्यूयॉर्कमधील ‘श्री तुलसी मंदिरा’बाहेरील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती.
Comments are closed.