पाकिस्तानला धूळ चारत हिंदुस्थानला क्रिकेटमध्ये सुवर्णपदक
पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून देत हिंदुस्थानने आशिया क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. अभिषेक शर्मा व तिलक वर्मा यांच्या घणाघाती फटकेबाजीच्या जोरावर हिंदुस्थानने प्रथम फलंदाजी करताना 211 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला 192 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि हिंदुस्थानने 19 धावांनी सामना जिंकत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
अभिषेकने सुरुवातीपासूनच दणकेबाज फटकेबाजीला सुरुवात केली. वैभव सूर्यवंशी 19 धावांवर बाद झाला असला तरी अभिषेकने मात्र 28 चेंडूंत तीन चौकार आणि सात षटकारांसह 61 धावांची तुफानी खेळी साकारली. अभिषेक बाद झाल्यावर हिंदुस्थानची धावगती मंदावेल असे वाटत होते, पण त्यानंतर मैदानात तिलक वर्माचे वादळ घोंघावले आणि त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. तिलकने 22 चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 51 धावांची दिमाखदार खेळी साकारत संघाला 211 धावांचा पल्ला गाठून दिला. हिंदुस्थानच्या 212 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला आश्वासक सुरुवात करता आली नाही. त्यांचे दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाले. हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा करत पाकिस्तानच्या गोलंदाजांवर अखेरपणे अंकुश ठेवला आणि सामना जिंकला. हिंदुस्थानकडून वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवले. त्यामुळे पाकिस्तानना 20 षटकांत 6 बाद 192 एवढीच मजल मारता आली.
Comments are closed.