270 ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळल्या, गांधीनगरमध्ये ‘डेंग्यूमुक्त अभियान’
महानगरपालिकेच्या ‘डेंग्यूमुक्त अहिल्यानगर’ अभियानाच्या दहाव्या आठवडय़ानिमित्त गांधीनगर परिसरात डेंग्यू प्रतिबंधाबाबत जनजागृती तसेच पाणीसाठय़ांची तपासणी करण्यात आली. यावेळी कै. बाळासाहेब केशव ठाकरे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी डेंग्यूविषयक जनजागृतीपर पथनाटय़ सादर करून नागरिकांना स्वच्छता व डास प्रतिबंधाचा संदेश दिला. तसेच विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
शहरात डेंग्यूमुक्त अहिल्यानगर अभियानाचा दहावा आठवडा सुरू असून, आतापर्यंत आशा व आरोग्यसेविकांच्या माध्यमातून 9 हजार घरांना भेटी देण्यात आल्या आहेत. 28 हजार पाणीसाठय़ांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 270 पाणीसाठे दूषित आढळले. या ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने संबंधित पाणीसाठय़ांवर उपाययोजना करण्यात आल्या. धूर व औषध फवारणी करून पाण्यात अबेट औषध टाकण्यात आले. परिसरातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचारही करण्यात आले, असे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.
आतापर्यंत शहरात डेंग्यूचे सहा रुग्ण आढळले आहेत. जनजागृतीच्या माध्यमातून त्यावर उपाययोजना केल्या जात असल्यामुळे शहरातील डेंग्यूची रुग्णसंख्या कमी झाली असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.
Comments are closed.