स्वत:शी बोलणं नॉर्मल की मानसिक आजार?




लोक स्वतःशी का बोलतात


आपल्यापैकी अनेकांना स्वतःशीच बोलण्याची सवय असते. अनेकदा आपण कामात असताना किंवा एखाद्या कठीण समयी स्वतःलाच सूचना देत किंवा समजावत असतो. बऱ्याचदा समोर कोणी नसतानाही आपण मनातल्या गोष्टी तोंडाने बोलून दाखवतो. अशा वेळी अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, स्वतःशी बोलणं ही एखादी मानसिक समस्या किंवा आजार तर नाही ना? याविषयी तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे हे जाणून घेऊयात.

तज्ज्ञांचे मत काय?

तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक वेळी स्वतःशी बोलणं ही चिंतेची किंवा भीतीची बाब नसते. मानसशास्त्रात याला सेल्फ-टॉक म्हटले जाते. संशोधनांनुसार जर आपण सकारात्मक पद्धतीने स्वतःशी बोलत असू तर तो मेंदूला शांत करण्याचा, भावना समजून घेण्याचा आणि तणाव कमी करण्याचा एक मार्ग असतो. कठीण प्रसंगात योग्य निर्णय घेण्यासाठी  अनेकदा लोक स्वतःशी बोलतात.

फायदे –

  • जेव्हा तुम्ही स्वतःशी सकारात्मक बोलता, तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो.
  • कामातील एकाग्रता वाढवण्यासाठी स्वतःला दिलेले निर्देश फायदेशीर ठरतात.
  • मनातील हुरहूर किंवा राग शांत करून स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे यामुळे सोपे जाते.

ही सवय कधी चिंतेचा विषय बनते?

जोपर्यंत तुम्ही स्वतःला समजवण्यासाठी, विचार स्पष्ट करण्यासाठी किंवा प्रेरणा देण्यासाठी स्वतःशी बोलत आहात, तोपर्यंत ही पूर्णपणे सामान्य सवय आहे. परंतु, हे पाहणे गरजेचे आहे की तुम्ही कोणत्या परिस्थितीत आणि कशा पद्धतीने बोलत आहात. जर तुम्हाला कधी जाणवले की प्रत्यक्षात कोणीही नसताना तुम्हाला कुणीतरी आवाज देत आहे किंवा अदृश्य आवाज ऐकू येत आहेत तर मात्र ही धोक्याची घंटा असू शकते.

कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये?

  • जर ही सवय तुमच्या नात्यांवर, कामावर विपरीत परिणाम करत असेल.
  • जर तुम्हाला विनाकारण भीती, नैराश्य वाटत असेल.
  • जर तुमच्या वागण्यात, झोपण्याच्या पद्धतीत किंवा मूडमध्ये अचानक मोठे बदल होत असतील.
  • जर तुम्ही स्वतःला समाज व लोकांपासून पूर्णपणे दूर करत असाल.

मानसिक आरोग्यसाठी सोप्या टिप्स:

  • तणाव योग्य पद्धतीने मॅनेज करा.
  • दररोज पुरेशी आणि गाढ झोप घ्या.
  • नियमितपणे व्यायाम किंवा योगासने करा.
  • विश्वासू व्यक्तींशी मोकळेपणाने बोला आणि मनातील भावना व्यक्त करा.

हेही वाचा – चहाऐवजी सकाळी उठल्यानंतर करा या हेल्दी पेयांचे सेवन



Comments are closed.