महापौर रितू तावडे यांना दंड, शिक्षक मारहाण प्रकरणी जामीन रद्द करण्याचा इशारा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

2016 मध्ये शिक्षकांना केलेल्या मारहाणप्रकरणी भाजप महापौर रितू तावडे यांना सत्र न्यायालयाने आज दणका दिला. सुनावणीला वारंवार अनुपस्थित राहिल्या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. जी. भन्साळी यांनी रितू तावडे यांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावला तसेच पुढील सुनावणीला प्रत्यक्ष हजर न राहिल्यास वॉरंट जारी करण्याबरोबरच जामीन रद्द करण्याचा इशारा न्यायालयाने दिला.

वाकोला येथील महापालिकेच्या उर्दू शाळेतील एका महिला शिक्षिकेची बदली बीकेसीतील दुसऱया विभागात करण्यात आल्याने याचा जाब विचारण्यासाठी रितू तावडे व इतर सहा जण शाळेत गेले होते. त्यावेळी तावडे व त्यांच्या सहकाऱयांनी शाळेत घुसून मुख्याध्यापिका आणि इतर कर्मचाऱयांशी हुज्जत घातली. तसेच दोन शिक्षकांना कानाखाली मारल्याचा आणि त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी तावडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तावडे यांनी सत्र न्यायालयात दोषमुक्ततेसाठी अर्ज केला होता; मात्र त्यांचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यामुळे महापौरांविरुद्ध मारहाण खटल्याची नियमित सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीवेळी महापौरांसह अन्य दोनजण गैरहजर राहिले होते. तावडे यांच्या वतीने अॅड. दुर्गा राजपूत यांनी महापौर या मुंबईच्या ‘प्रथम नागरिक’ असल्याने त्यांना महापालिकेच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहावे लागते आणि त्यांचे वेळापत्रक व्यस्त असल्याचे सांगितले. अन्य दोन आरोपींनीही सामाजिक कामांमुळे व्यस्त असल्याचे कारण देत उपस्थितीतून सूट मागितली; मात्र अतिरिक्त सरकारी वकील इक्बाल सोलकर यांनी या मागणीला विरोध केला. आरोपी जाणीवपूर्वक न्यायालयात गैरहजर राहत असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. न्यायालयाने आरोपींची सूट देण्याची मागणी मान्य केली; मात्र महापौर तावडे यांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावला.

Comments are closed.