डॉक्टर आणि रुग्णालयांसाठी सोशल मीडिया धोरण
उपचारांची हमी’, ‘नंबर-वन डॉक्टर’ यांसारख्या दाव्यांवर बंदी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) डॉक्टर आणि रुग्णालयांच्या प्रसिद्धीसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये डॉक्टर, रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांसाठी जाहिरात, सोशल मीडिया प्रसिद्धी, पॉडकास्ट, वेबसाइट्स, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आणि एआय-निर्मित प्रसिद्धी साहित्यासाठी नियम निश्चित केले आहेत. रुग्णांना दिशाभूल करणाऱ्या दाव्यांपासून वाचवणे आणि वैद्यकीय व्यवसायाची प्रतिष्ठा जपणे हा या मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जोपर्यंत ‘सर्वोत्तम’, ‘नंबर-वन’, ‘अग्रणी’, ‘सर्वांत विश्वासार्ह’, ‘टॉप’ किंवा ‘नंबर-वन विशेषज्ञ’ यांसारख्या दाव्यांची स्वतंत्रपणे आणि पारदर्शकपणे पडताळणी करता येत नाही, तोपर्यंत डॉक्टर किंवा रुग्णालये त्यांच्या प्रसिद्धीमध्ये असे दावे करू शकणार नाहीत. त्याचप्रमाणे, ‘उपचाराची हमी’ यांसारखे दावे करून रुग्णांना आकर्षित करण्यास देखील मनाई करण्यात आली आहे.
‘एनएमसी’ने वैद्यकीय जाहिरातीची व्याख्या अधिक व्यापक केली आहे. यामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, वेबसाइट्स, ब्लॉग्स, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, पॉडकास्ट, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग, डिजिटल प्रमोशन आणि एआय वापरून तयार केलेल्या प्रचारात्मक सामग्रीचाही समावेश आहे. आता डॉक्टर आणि रुग्णालये सोशल मीडियावर जाहिरात करू शकणार नाहीत, कारण ते जाहिरातीच्या नियमांच्या बाहेर मानले जाईल. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये रुग्णांचे फोटो, व्हिडिओ, वैद्यकीय नोंदी, उपचारांची माहिती, क्लिनिकल प्रतिमा आणि रुग्णांचे अनुभव किंवा प्रशस्तिपत्रांच्या वापराबाबतही कठोर नियम आहेत. रुग्णाची ओळख पटवणाऱ्या माहितीच्या वापरास मनाई आहे.
Comments are closed.