राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांवर गुन्हे
ऑल इंडिया रेडिओ कार्यालयात जबरदस्तीने प्रवेश केल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निवडणूक आयोगाविरोधातील मंगळवारच्या आंदोलनादरम्यान ऑल इंडिया रेडिओ भवन परिसरात झालेल्या अनधिकृत प्रवेश आणि धरणे आंदोलनाविरोधात दिल्ली पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. दिल्ली पोलिसांनी बुधवारी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी-वद्रा आणि विरोधी आघाडीतील इतर अनेक खासदारांविरुद्ध एफआयआर दाखल केला.
काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी संसद भवनापासून निवडणूक आयोगाचे मुख्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्याची योजना आखली होती. या प्रस्तावित निदर्शनासाठी आणि मोर्चासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती. निवडणूक आयोगाच्या कार्यालयाजवळ लावलेल्या बॅरिकेड्समुळे आंदोलकांना रोखण्यात आले, तेव्हा अनेक नेते आणि खासदार रस्त्यावरच धरणे आंदोलनावर बसले, असे पोलिसांनी सांगितले.
हाय-व्होल्टेज नाट्या
पोलिसांच्या आरोपानुसार, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना रोखल्यानंतर, त्यांनी इतर विरोधी खासदार आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसह पार्लमेंट स्ट्रीटवरील आकाशवाणी भवन संकुलात पूर्वपरवानगीशिवाय प्रवेश केला. आत शिरल्यावर या नेत्यांनी संकुलात धरणे आंदोलन सुरू केले. हे धरणे आंदोलन आठ तासांहून अधिक काळ चालले. आकाशवाणी भवनमधील या हाय-व्होल्टेज नाट्यानंतर, दिल्ली पोलिसांनी संकुल मोकळे करण्यासाठी कारवाई करताना राहुल गांधी, प्रियांका गांधी, के. सी. वेणुगोपाल आणि इतर नेत्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर या नेत्यांना किंग्सवे कॅम्पमधील न्यू पोलीस लाइन्समध्ये नेण्यात आले. रात्री 10 वाजल्यानंतर पोलिसांनी सर्व नेत्यांची मुक्तता केली होती.
Comments are closed.