एकूण १३.३९ कोटी मतदारांना वगळण्यात आले.
विरोधकांच्या आरोपांना निवडणूक आयोगाचे उत्तर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय निवडणूक आयोगाचे हाती घेतलेल्या मतदारसूची सखोल पुनर्परीक्षण (एसआयआर) अंतर्गत 13.39 कोटी नावे वगळण्यात आली आहेत, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. या प्रक्रियेत एकंदर 95.40 कोटी मतदारांच्या नावांचे पुनर्परीक्षण करण्यात आले, अशीही माहिती दिली गेली आहे. अद्यापही, ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट नाहीत, असे मतदार योग्य प्रक्रियेचा उपयोग करून नावे समाविष्ट करुन घेऊ शकतात, असे स्पष्ट केले गेले आहे.
जी नावे वगळण्यात आली आहेत, त्यांची वर्गवारीही केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. नावे वगळण्यासाठी आयोगाने ‘एएसडीडी’ हे सूत्र लागू केलेले आहे. याचा अर्थ ‘अॅबसेंट’ किंवा नॉट ट्रेसेबल (अनुपस्थित किंवा शोधता न येण्यासारखे), परमनंटली शिफ्टेड (स्थायी स्वरुपात स्थलांतरित), डेड (मृत) आणि इतर श्रेणीतील अशी ही वर्गवारी आहे. देशातील सर्व मतदारांचे या प्रक्रियेअंतर्गत मॅपिंग करण्यात आल्यानंतर ही नावे वगळण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात आला. देशातील 22 लाखांहून अधिक मतदान केंद्रांशी संबंधित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना नवी त्या-त्या मतदान केंद्राशी संबंधित मतदारसूची देण्यात आल्या आहेत, असेही महत्त्वपूर्ण प्रतिपादन केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गेले गेले आहे.
10 लाखांहून अधिक अधिकारी
ही एसआयआर प्रक्रिया करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने एकंदर 10 लाखांहून अधिक बूथ लेव्हल ऑफिसर्स किंवा बीएलओज नियुक्त केले आहेत. त्यांनी मतदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याकडून आवश्यक ते फॉर्मस् भरून घेतले आहेत. तसेच आवश्यक की कागदपत्रेही घेतली आहे. या फॉर्मस्चे आणि कागदपत्रांचे परीक्षण करून मतदारांची नावे मतदारसूचीत राहू देण्याचा, नवी नावे समाविष्ट करण्याचा आणि नावे वगळण्याचा निर्णय नियमबद्ध पद्धतीने घेण्यात आला आहे. अंतिम मतदारसूची आता सज्ज आहे, अशी माहिती देण्यात आली.
एक महिन्याचा कालावधी
नव्या मतदारसूचीचे कच्चे प्रारुप प्रसिद्ध केल्यानंतर, मतदारांना आक्षेप नोंदविण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत, त्यांना या एक महिन्याच्या कालावधीत त्यांचे नाव नियमांच्या अनुसार समाविष्ट करण्यासाठी संधी देण्यात आली होती. मतदार सूचीतील जे मतदार अपात्र आहेत, त्यांच्याविरोधात आक्षेप नोंदविण्यासाठीही संधी देण्यात आली होती. त्यानंतर आता अंतिम सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अनावधानाने नाव वगळले गेल्यास…
ज्या पात्र मतदारांची नावे तांत्रिक अडचणींमुळे किंवा अनावधानाने वगळली गेलेल्यांनाही नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी संधी देण्यात आली होती. नावे समाविष्ट करण्यासाठी आक्षेप किंवा आवेदने सादर करण्यास अनुमती देण्यात आली होती. फॉर्म क्रमांक 6 च्या माध्यमातूनही मतदारांना नावे समाविष्ट करण्याची संधी देण्यात आली. अद्यापही जे मतदार पात्र आहेत, पण ज्यांची नावे समाविष्ट करण्यात आलेली नाहीत, ते नावे समाविष्ट करून घेऊ शकतात. आयोगाने ही सुविधा दिली आहे, असे स्पष्टीकरण आयोगाकडून करण्यात आले.
अपील करण्याची संधी
निहीत प्रक्रिया पूर्ण करूनही एखाद्या मतदाराचे नाव सूचीत समाविष्ट झालेले नसेल, तर असा मतदार नाव समाविष्ट न करण्याच्या विरोधात आयोगाकडे अपील करू शकतो. हे अपील जिल्हा दंडाधिकारी (डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट) किंवा मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे केले जाऊ शकते, अशीही माहिती देण्यात आली आहे. एसआयआरची प्रक्रिया पूर्णत: कायद्याच्या नियमांच्या अंतर्गत आणि दक्षतापूर्वक पूर्ण करण्यात आली आहे, असेही आयोगाच्या निवेदनात स्पष्ट केले गेले आहे.
मतदारांची अंतिम सूची प्रसिद्ध
ड अनेक राज्यांमधील एसआयआर प्रक्रिया पूर्ण, अंतिम मतदारसूची प्रसिद्ध
ड प्रक्रिया पूर्ण करूनही नावे समाविष्ट न झालेल्या मतदारांना अपीलाची संधी
ड अनावधानाने समाविष्ट न झालेले मतदार अद्यापही करू शकतात आवेदन
संख्यांमध्ये ‘एसआयआर’
ड एकंदर पुनर्परिक्षित मतदार : 95.40 कोटी
ड एसआयआरमधून वगळले : 13.39 कोटी
ड एसआयआरसाठी कर्मचारी : 10 लाखांहून अधिक
वगळलेल्या मतदारांची वर्गवारी
ड अनुपस्थित किंवा अनट्रेसेबल : 3.01 कोटी
ड स्थायी स्वरुपात स्थलांतरित : 6.30 कोटी
ड मृत मतदार : 2.80 कोटी
ड डुप्लिकेट मतदार : 1.02 कोटी
ड इतर श्रेणींमधील मतदार : 0.26 कोटी
ड एकंदर वगळलेले मतदार : 13.39 कोटी
Comments are closed.