सिडकोच्या मनमानी कारभाराविरोधात उरणमधील गावकरी आक्रमक; घरे, जागाजमिनी वाचवण्यासाठी आजपासून आंदोलन
विस्तारित गावठाण, साडेबारा टक्के विकसित भूखंड, वाढीव मोबदला, पुनर्वसन आदी अनेक प्रश्न प्रलंबित असताना सिडकोने बोकडवीरा गावाच्या हद्दीत मातीचा भराव करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे संतप्त भूमिपुत्रांनी या भरावाचे काम बंद करण्यासाठी उद्यापासून आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यासाठी उरणमध्ये झालेल्या बैठकीला भूमिपुत्रांनी मोठी गर्दी केली होती. सिडकोच्या मनमानीविरोधात उद्यापासून धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.
बोकडवीरा ग्रामस्थांच्या अनेक मागण्या सिडकोकडे प्रलंबित आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून सिडकोने बोकडवीरा गावालगत सिडकोच्या द्रोणागिरी नोडमधील सेक्टर ४१मध्ये मोकळ्या भूखंडावर मंगळवारपासून पोलीस बंदोबस्तात मातीचा भराव करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या घरांजवळ भरावाच्या कामाला सुरुवात झाल्याने एकच खळबळ उडाली. या कामाला ग्रामस्थांनी विरोधही केला. मात्र सिडकोने दाद दिली नाही. सिडकोने सुरू केलेल्या भरावाच्या कामाविरोधात आज भूमिपुत्रांनी तातडीने बैठक घेतली. सिडको अधिकारी, पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यात संयुक्त बैठकीत सिडकोने भरावाचे काम प्रथम बंद करून ग्रामस्थांच्या मागण्यांवर चर्चा करावी अशी जोरदार मागणी केली.
- ग्रामस्थांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची प्रशासनाने लेखी हमी द्यावी. ग्रामस्थांच्या हरकती व आक्षेपांची अधिकृत नोंद घेण्यात यावी. ग्रामस्थांशी चर्चा करूनच पुढील कार्यवाही करण्यात यावी, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
- सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे सिडकोच्या विरोधात उद्यापासून धरणे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या आंदोलनात माजी आमदार बाळाराम पाटील हे सहभागी होणार आहेत.
Comments are closed.