रस्ताच उरला नाही तर शेतात जाणार कसे? विरार-अलिबाग कॉरिडोरला विरोध; भिवंडीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडोरला भिवंडीतील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे. या प्रकल्पासाठी जमिनी संपादित करण्यात येत असून त्या मोबदल्यात सरकार अतिशय कमी पैसे देत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. दरम्यान या कॉरिडोरला विरोध करण्यासाठी आज स्थानिक शेतकऱ्यांनी भिवंडी-वसई मार्गावरील खारबाव येथे रास्ता रोको आंदोलन केले. दोन तास करण्यात आलेल्या आंदोलनामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. तसेच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या कॉरिडोरला आमची जमीन दिली तर शेतात जायला रस्ताच उरणार नाही, असाही दावा आंदोलनकर्त्यांनी केला.
विरार-अलिबाग कॉरिडोर प्रकल्पामुळे भिवंडी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहेत. याच भागातून बुलेट ट्रेनचा मार्ग जात आहे. बुलेट ट्रेनसाठी गुंठा ११ लाख रुपयांचा भाव दिला जात असताना विरार-अलिबाग मार्गासाठी ४ लाख गुंठा दर दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे आंदोलनकर्त्या दीपाली काटे यांनी सांगितले.
मागण्या मान्य न झाल्यास एक इंचही जमीन देणार नाही
बुलेट ट्रेन प्रकल्पात शेतकऱ्यांना मिळालेल्या दराप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे. तसेच कॉरिडोरच्या पलीकडे जाणाऱ्या शेतीसाठी स्वतंत्र रस्ता, अंडरपास किंवा योग्य कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्त बाधित शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर एक इंचही जागा या प्रकल्पासाठी देणार नाही, असा इशारा भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने हर्षल पाटील यांनी दिला आहे.
यांचा सहभाग
या रास्ता रोको आंदोलनात खारबाव सरपंच महेंद्र पाटील, वसंत पाटील, सुमित म्हात्रे, हर्षल पाटील, दीपाली काटे, मनोज म्हात्रे, बाळा पाटील, अशोक पालकर, रमेश कारभारी, सुनील चव्हाण यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ भूमिपुत्र व महिला सहभागी झाले होते.
Comments are closed.