भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून पाकिस्तानचा पत्ता कट, बांगलादेशला मिळाली संधी

आगामी आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ मधून पाकिस्तान संघाला वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी बांगलादेशचा समावेश करण्यात आला आहे. भारतात होणाऱ्या या स्पर्धेचे सामने पंजाबच्या जालंधर आणि मोहाली येथे खेळले जाणार आहेत. ही स्पर्धा २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली आहे.

जपानमध्ये झालेल्या २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या ऐतिहासिक विजयाने संघाच्या प्रवासात आणखी एका निर्णायक अध्यायाची भर घातली, कारण भारताने प्रथमच आपल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेतेपदाचे यशस्वीपणे रक्षण केले होते. खेळाडू आणि चाहते या दोघांच्याही मनात ही कामगिरी ताजी असताना, आता सर्वांचे लक्ष मायदेशात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीकडे आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सहा संघांमध्ये भारतासोबत जपान, चीन, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि बांगलादेश यांचा समावेश असेल, असे हॉकी इंडियाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

जेव्हा या स्पर्धेची घोषणा झाली, तेव्हा पाकिस्तानचा स्पर्धेत सहभाग होता. त्यांच्या फेडरेशनने आशियाई हॉकी फेडरेशनकडे त्यांचे सामने भारतात न होता इतर ठिकाई हलवण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला हॉकी इंडियाचे सरचिटणीस आणि आशियाई हॉकी फेडरेशनचे उपाध्यक्ष भोला नाथ सिंग यांनी स्पष्ट नकार दिला होता.

आता हॉकी इंडियाने जाहीर केलेल्या निवेदनातून पाकिस्तानचे नाव वगळले आहे.

या स्पर्धेच्या साखळी फेरीतील सर्व सामने जालंधरच्या ऑलिम्पियन सुरजित सिंग हॉकी स्टेडियमवर खेळले जातील, तर स्पर्धेतील निर्णायक सामने मोहाली येथे होतील.

उपांत्य फेरी आणि अंतिम सामना ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी मोहालीच्या ऑलिम्पियन बलबीर सिंग वरिष्ठ आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर खेळले जातील.

२०११ मध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरूवात झाली. तेव्हापासून भारताने चार वेळा विजेतेपद पटकावून या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ म्हणून स्थान मिळवले आहे. याशिवाय २०१८ मध्ये ओमानच्या मस्कत येथे झालेला अंतिम सामना पावसामुळे रद्द झाल्याने भारताने पाकिस्तानसोबत एकदा ही ट्रॉफी विभागून घेतली होती. (Pakistan out of Asian Hockey Champions Trophy 2026 to be held in India; Bangladesh gets opportunity)

Comments are closed.