राजघाटावर विरोधकांचे आंदोलन

ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेण्याचा निर्धार

आंदोलन आणि टीका

  • विरोधी पक्षांचे गुरुवारचे आंदोलन राजघाटावर शांततेत, कडक बंदोबस्त
  • ज्ञानेश कुमार यांनी पदत्याग केल्यानंतरच आंदोलन थांबविण्याचा निर्धार
  • काँग्रेस-विरोधी पक्षांचे आंदोलनच घटनाविरोधी : भाजकडून जोरदार टीका

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पदत्याग करावा, या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजघाटावर आंदोलन केले आहे. हे आंदोलन गुरुवारी शांततापूर्ण पद्धतीने पार पडले. आंदोलनकाळात नेत्यांनी घोषणाबाजी न करता शांततेत धरणे दिले. भारतीय जनता पक्ष मुख्य निवडणूक आयुक्तांच्या माध्यमातून ‘मतचोरी’ करुन निवडणुकांमध्ये विजयी होत आहे, असा आरोप त्यांनी केला. गुरुवारी दुपारी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये भोजन करुन विरोधी पक्षांचे खासदार राजघाटाकडे जाण्यास निघाले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विरोधी पक्षांचे साधारणत: 300 खासदार आंदोलनात सहभागी झाले होते. तसेच अनेक कार्यकर्त्यांचाही समावेश होता. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सीपीआय, सीपीआयएम, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष आदी पक्षांच्या खासदारांचा आंदोलनकर्त्यांमध्ये समावेश होता. काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील दुपारनंतर या आंदोलात सहभागी झाल्याचे दिसून आले. लोकशाही वाचविण्यासाठी आणि मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही आंदोलन करीत आहोत. ते शुक्रवारीही केले जाईल. ज्ञानेश कुमार यांनी पदत्याग करेपर्यंत हे आंदोलन होत राहील, असे प्रतिपादन पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी केले.

सलग तिसरा दिवस

काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष यांच्या आंदोलनाचा हा सलग तिसरा दिवस होता. बुधवारी जंतरमंतरवर आंदोलन करण्यात आले होते. तर मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. राजघाटावर आंदोलन करण्यासाठी विरोधी पक्षांचे खासदार आणि नेते बसेसमधून आले होते. राजघाटावर महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी त्यांनी धरणे धरले.

मतदारांसाठी प्रार्थना

राजघाटावर महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी प्रार्थना केल्याची माहिती पवन खेडा यांनी दिली. ही प्रार्थना मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण व्हावे, यासाठी करण्यात आल्याने त्यांनी स्पष्ट केले. लोकशाहीच्या संरक्षणासाठी प्रत्येक मतदाराला मतदानाचा अधिकार मिळणे आवश्यक आहे, अशी मागणी खेडा यांनी केली.

राहुल गांधी यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी गुन्हेगारी कारस्थान केले असून या कारस्थानाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण देश हायजॅक केला आहे. त्यांनी देशाची घटना उध्वस्त केली आहे. तसेच मतदारांच्या मतांची चोरी केली आहे, असा आरोप आंदोलनाआधी राहुल गांधी यांनी केला.

विरोधकांचे आंदोलन घटनाविरोधी

विरोधकांनी चालविलेले एसआयआर विरोधी आंदोलन घटनाविरोधी असून ते केवळ राजकीय स्वार्थासाठी करण्यात येत आहे. भारताच्या घटनेच्या अनुच्छेद 324 प्रमाणे आणि लोकप्रतिनिधीत्व कायदा अनुच्छेद 21 प्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोगाला मतदारसूची सखोल पुनर्सर्वेक्षण करण्याचा अधिकार आहे. आजवर अनेकदा अशी सर्वेक्षणे झाली आहेत. विरोधक निवडणुकीत पराभूत होतात. त्यामुळे ते नैराश्याने ग्रासले गेले आहेत. आपली अकार्यक्षमता लपविण्यासाठी ते एसआयआर आणि ज्ञानेश कुमार यांना विरोध करीत आहेत. जनतेचा एसआयआरला पाठिंबा आहे. त्यामुळे विरोधकांची कोंडी झाली आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे हिमाचल प्रदेशातील आमदार रणधीर शर्मा यांनी केली. विरोधकांची ही कारस्थाने त्यांच्यावरच उलटणार असून त्यांना निवडणुकांमध्ये याची प्रचीती येईलच. या देशातील जनता सूज्ञ असून ती विरोधकांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादनही रणधीर शर्मा यांनी केले आहे.

Comments are closed.