ज्ञानेश कुमार यांची 'झेड प्लस' सुरक्षा आणखी मजबूत करण्यात आली आहे.

विरोधी पक्षांच्या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारचा निर्णय

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

मतदारयाद्यांच्या विशेष सघन पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेतील कथित अनियमिततेवरून सुरू असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांची ‘झेड-प्लस’ सुरक्षा आणखी मजबूत केली आहे. त्यांच्या निवासस्थानासह निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आणि वैयक्तिक सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. दिल्ली आणि आग्रा येथील मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या आंदोलनांनंतर सुरक्षा यंत्रणांनी हे पाऊल उचलले आहे. दिल्लीतील अशोक रोडवरील निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाच्या आत आणि बाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), रॅपिड अॅक्शन फोर्स (आरएएफ), सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातील त्यांचा गृहजिल्हा असलेल्या आग्रा येथील त्यांच्या घरीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तेथे निमलष्करी सुरक्षा कर्मचाऱ्यांची तैनाती वाढवण्यात येईल. न्यू मोती बाग कॉलनीतील त्यांच्या घराच्या आत आणि बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. कॉलनीबाहेर निमलष्करी दलाच्या जवानांनी भरलेली एक संपूर्ण बस तैनात करण्यात आली असून, प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेली माहिती आणि त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. ‘झेड-प्लस’ श्रेणीतील सुरक्षा असलेल्या व्यक्तींसाठी घरी आणि त्यांच्या ताफ्यात कडक सुरक्षा व्यवस्था असते. अंदाजे 50 सुरक्षा कर्मचारी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतात. मात्र, आता ज्ञानेश कुमार यांच्या बाबतीत त्यातही आणखी वाढ करण्यात आली.

युवक काँग्रेसचा निषेध

भारतीय युवक काँग्रेसने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी यापूर्वी, 27 सप्टेंबर रोजी त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते. हे आंदोलन  पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ दडपले. त्यानंतर आता काँग्रेस, सीजेपी यांच्यासह इतर विरोधी पक्षांकडून आंदोलनाचे सत्र सुरू असल्याने सतर्कता जारी करण्यात आली आहे.

Comments are closed.