यशस्वी जैसवाल घेतोय यष्टिरक्षणावर मेहनत
हिंदुस्थानच्या संघात स्थान टिकवणं ही सोपी गोष्ट नाही आणि ती यशस्वी जैसवालच्या आता लक्षात आली आहे. यशस्वीने दमदार फलंदाजी तर केलीच आहे, त्याचबरोबर त्याने लेगस्पिन गोलंदाजी करायलाही सुरुवात केली. पण तरीही त्याला हिंदुस्थानच्या टी-20 आणि वन डे क्रिकेट संघात संधी मिळालेली नाही. ही गोष्ट मिळवण्यासाठी आता तो यष्टिरक्षणावर मेहनत घेत असल्याची महत्त्वाची माहिती मुंबईच्या रणजी संघाचा कर्णधार सिद्धेश लाडने दिली.
यंदाच्या रणजी करंडक हंगामापूर्वी जैसवाल आपल्या यष्टिरक्षणाच्या कौशल्यावर कठोर मेहनत घेत असल्याचे फोटो समोर आले होते. 24 वर्षीय जयस्वाल हिंदुस्थानी संघाच्या नेट्समध्ये लेगस्पिनचा सरावही करत होता आणि त्याने काही सामन्यांमध्ये गोलंदाजीही केली आहे. रविवारी वानखेडे स्टेडियमवर सुरू होणाऱ्या चंदिगडविरुद्धच्या मुंबईच्या पहिल्या रणजी करंडक सामन्यासाठी जैसवाल उपलब्ध असेल. पण राष्ट्रीय जबाबदाऱ्यांमुळे तो दुसऱया सामन्यानंतर उपलब्ध राहणार नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रणजी ट्रॉफीपूर्वी मुंबईच्या एका सराव सामन्यादरम्यान जयस्वालने दहा षटके यष्टिरक्षण केले होते.
जैसवालच्या यष्टिरक्षणाबाबत सिद्धेश म्हणाला की, ‘तो एक असा खेळाडू आहे ज्याने यष्टिरक्षणाचा सराव सुरू केला आहे. कारण त्याला आपल्या खेळात काहीतरी नवीन आणायचे आहे असे वाटते. त्याचा हेतू काय आहे हे मला माहीत नाही, पण तो सध्या यष्टिरक्षणाचा सराव करत आहे आणि जर त्याने सराव सुरू ठेवला तर त्याला त्याची सवय होईल.’
Comments are closed.