पाणीकपात लागू असताना रस्ते धुण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईत रहिवासी क्षेत्रात 10 टक्के तर व्यावसायिक क्षेत्रासाठी 20 टक्के पाणीकपात लागू असताना पालिका प्रशासनाने मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी टँकरने पाणी आणून रस्ते धुण्याबाबतचा प्रस्ताव सत्ताधारी, विरोधी पक्षाच्या गटनेते, नगरसेवकांनी एकमताने फेटाळून लावला.

रस्ते धुण्याच्या कामासाठी सातही परिमंडळांत ई-निविदा काढून मर्जीतील पंत्राटदारांची  शिफारस केली असून पालिकेच्या तिजोरीतून तब्बल 8 कोटी 24 लाख रुपयांहून अधिक निधी दिला जाणार आहे. लाखो लिटर पाण्याचा अपव्यय करून पंत्राटदारांचे खिसे भरण्याचा उद्योग केला जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावावर चर्चा करताना ‘मुंबईत पाणी समस्या भेडसावत असताना रस्ते पाण्याने धुणे चुकीचे ठरेल. त्यामुळे रस्ते पाण्याने धुण्याचा प्रस्ताव रेकॉर्ड करावा,’ अशी मागणी पालिका सभागृह नेते गणेश खणकर यांनी केली.  त्याला समर्थन देताना शिवसेनेचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी व्हॅक्युम क्लीनरच्या धर्तीवरील यंत्रणेचा अवलंब केल्यास टँकरच्या पाण्याची गरज पडणार नाही आणि रस्तेही चांगले होतील, असे मत मांडले. रस्त्यांवरील धूळ काढली पाहिजे. पण एवढे मोठे टेंडर कोणत्या आधारावर देत आहात, असा सवाल एमआयएमचे जमीर पुरेशी यांनी केला. शिंदे गटाचे अमेय घोले यांनी  राज्यातील अनेक तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती असताना मुंबईत मात्र रस्ते पाण्याने धुतल्यास शेतकऱ्यांची थट्टा केल्यासारखे होईल, असे सांगितले. मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी पालिकेने पाणी वितरणाबाबत स्वतंत्र आराखडा तयार करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

अखेर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी साधकबाधक चर्चेअंती नाराजी व्यक्त करीत मुंबईतील धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी इमारत बांधकामे करणाऱ्या संबंधित विकासकांवर काही प्रमाणात जबाबदारी टापू शकतो का ते पहावे, असे सांगत सदर प्रस्ताव रेकॉर्ड केला.

मुंबईतील रस्ते धुण्यासाठी जेटिंग व्यवस्थेसह पाण्याचे टँकर 150 दिवसांसाठी (पावसाळा वगळून) भाडेतत्त्वावर पुरवठा करण्याबाबतचा (परिमंडळ-1 ते परिमंडळ 7) प्रस्ताव प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) यांच्या वतीने स्थायी समितीच्या बैठकीत आज मंजुरीसाठी सादर करण्यात आला. त्यावर सभागृह नेत्यांसह सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेत विरोध दर्शवला.

Comments are closed.