मणिपूरमध्ये महिलेची गोळ्या झाडून हत्या

कुकी-नागा गटांमध्ये पुन्हा एकदा तणावाची स्थिती

वृत्तसंस्था/ इंफाळ

अशांत मणिपूरमध्ये पुन्हा एकदा अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. राज्यातील कामजोंग जिह्यात पाच मुलांच्या आईची संशयास्पद परिस्थितीत गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात मोठा हिंसाचार उसळला आणि कुकी व नागा गटांमध्ये अंदाधुंद गोळीबार सुरू झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून प्रशासनाने परिसरात कडक निर्बंध लादले. ही घटना शुक्रवारी रात्री सुमारे 9:35 वाजता चासद गावात घडली.

कामजोंग जिल्ह्यातील चासद गावात शुक्रवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी एका महिलेवर गोळीबार केला. पाच मुलांच्या या आईला मानेजवळ गोळी लागल्याने काही मिनिटांतच तिचा मृत्यू झाला. यासंबंधीचे वृत्त परिसरात पसरताच संतापाची लाट तीव्र झाली. तणाव वाढल्याने अतिरिक्त फौजफाटा मागवून जमावाला नियंत्रित करण्यात आले. या घटनेते संशयित हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास पथके नियुक्त करण्यात आली असली तरी शनिवारी सायंकाळपर्यंत संबंधितांचा मागमूस लागला नव्हता.

Comments are closed.