शिवसेना भवनाबाहेर राडा आदित्य ठाकरे पोलिसांना भिडले… व्हॅनवर चढले; पकडलेल्या ‘जेन-झीं’ची शिवसेना आणि मनसेच्या दणक्यानंतर सुटका
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखल्याने आणि सक्तीने ताब्यात घेतल्याने आज वातावरण चिघळले. आंदोलकांना गाडय़ांमध्ये कोंबून पोलीस घेऊन जात असतानाच शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आक्रमक झाले. तेजस ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे हेसुद्धा रस्त्यावर उतरले. आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवनाबाहेर पोलिसांच्या व्हॅनवर चढून ती अडवून धरली. आंदोलकांना सोडा अन्यथा गाडी जाऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. बघता-बघता हजारो शिवसैनिक शिवसेना भवनाजवळ पोहोचले. अखेर पोलिसांना नमते घेऊन आंदोलकांना सोडावे लागले. त्यानंतर शिवसेना आणि मनसेच्या दणक्याने शिवाजी पार्क पोलिसांना दादर परिसरातून ताब्यात घेतलेल्या आंदोलकांनाही सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी देशभरात आंदोलन पेटले आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलनासाठी कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) हजारो कार्यकर्ते देशभरातून दाखल होत आहेत. त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. त्याच दरम्यान आज सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर अचानक आंदोलन छेडले. त्यामुळे संपूर्ण शिवाजी पार्क आणि दादर परिसराला पोलीस छावणीचे रूप आले होते.
आंदोलकांना रोखण्यासाठी रस्ते, बसेस, लोकल, मेट्रो अशा विविध मार्गांवर तैनात होऊन पोलिसांनी सकाळपासूनच संशयित दिसतील त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली. शिवाजी पार्कवर फिरायला येणाऱ्या सामान्य नागरिकांनाही पोलिसांनी जबरदस्तीने गाडीत कोंबल्याने संताप निर्माण झाला. अमित ठाकरे यांना ते वृत्त कळताच ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पोलिसांना जाब विचारला. दरम्यान, शेकडो आंदोलकांना पकडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात नेण्यात आले. अमित ठाकरे पोलीस ठाण्यात पोहोचताच पोलिसांनी त्यांनाही तिथेच रोखून धरले. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांसोबत पोलीस ठाण्याबाहेरच धरणे धरले.
शिवसेना भवनाबाहेरही सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून युवासेनेच्या वतीने आंदोलन केले जाणार होते. त्यासाठी आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, शिवसेना नेते आमदार अनिल परब व सुनील प्रभू, स्थानिक आमदार महेश सावंत यांच्यासह शिवसेना व मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलकांवर जोर जबरदस्ती केली जात असल्याचे त्यांना कळताच आदित्य व अन्य मंडळी रस्त्यावर उतरली. त्यांनी शिवसेना भवनाबाहेरच पोलिसांच्या गाडय़ा रोखल्या. यावेळी जोरदार घोषणाबाजीने शिवसेना भवनचा परिसर दुमदुमला. सीजेपीचे विविध भागांतून आलेले कार्यकर्तेही त्यात सहभागी झाले. शिवसैनिक आणि सीजेपी कार्यकर्ते आक्रमक होऊ लागल्याने पोलिसांना व्हॅनमध्ये कोंबलेल्या आंदोलकांना सोडून द्यावे लागले.
आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नंतर तो सर्व जमाव थेट शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलीस ठाण्याबाहेरच त्यांनी ठिय्या मांडला. भारतमाता की जय…वंदे मातरम…इन्कलाब झिंदाबाद…जब जब मोदी डरता है, पुलीस को आगे करता है, ज्ञानेश कुमार राजीनामा दो आदी जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना चर्चेसाठी बोलवले. पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेतलेल्या सर्व आंदोलकांना तातडीने सोडून द्या, अशी मागणी त्यांनी केली. सुमारे अर्धा तासाच्या चर्चेनंतर पोलिसांनी आंदोलकांना सोडून दिले. त्याची घोषणा आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी पोलीस ठाण्याबाहेर गाडीवर चढून केली तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
शिवसैनिक पोलिसांना भिडले
शिवाजी पार्कवर आज पोलीस दिसेल त्याला उचलून घेऊन जात होते. या अन्यायाविरोधात शिवसेना भवन येथे आमदार महेश सावंत, नगरसेविका श्रद्धा जाधव, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, सूरज चव्हाण, माधुरी मांजरेकर, अखिल चित्रे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते एकवटले. शिवसैनिक आंदोलक व आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे पाहून पोलीस फौजफाटय़ासह तेथे धडकले आणि बळाचा वापर करत शिवसैनिकांची धरपकड करू लागले. पण शिवसैनिकदेखील दंड थोपाटत पोलिसांना भिडले. पोलीस आणि शिवसैनिक भिडल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी शिवसेना भवनात घुसून आंदोलकांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण शिवसैनिकांनी जोरदार प्रतिकार केला आणि पोलिसांना आल्या मार्गे परत पाठवले.
आंदोलकांची धरपकड करून त्यांना पोलिसांनी व्हॅनमध्ये कोंबले होते. शिवसैनिकांनी ही व्हॅन रोखली. आदित्य ठाकरे हे थेट या व्हॅनवर चढले आणि त्यांनी पोलिसांना ठणकावले. नाहक पकडलेल्या आंदोलकांना सोडल्याशिवाय हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यानंतर तेजस ठाकरे यांच्यासह शिवसैनिकांनी या व्हॅनसमोर ठिय्या दिला. या दणक्याने पोलिसांना नमते घ्यावे लागले व व्हॅनमधील सर्व आंदोलक विद्यार्थ्यांना सोडण्यात आले. त्याचे सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
आज शिवाजी पार्कवर मूक निदर्शने
दडपशाही चालू देणार नाही असा इशारा देत शिवसेनेने उद्या मूक निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील माँसाहेब मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ सायंकाळी 4 ते 7 या वेळेत हे आंदोलन केले जाणार आहे. ‘हाती तिरंगा घेऊन या, आंदोलनात सहभागी व्हा’ असे आवाहन शिवसेनेने केले आहे. सर्व आंदोलक तोंडावर काळी फित बांधून या आंदोलनात सहभागी होतील.
शिवसेनाप्रमुखांच्या त्या सभेची आठवण, आदित्य आणि अमित ठाकरे यांचे गाडीच्या टपावर उभे राहून भाषण
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ावेळी 1969 मध्ये प्रचंड गर्दीत गाडीच्या टपावर उभे राहून जनसमुदायाला संबोधित केले होते. त्याचे स्मरण रविवारी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या आक्रमक बाण्याने झाले. दंडुकेशाहीच्या धाकाने पोलिसांनी धरपकड करून आंदोलकांना कोठडीत डांबले होते. त्यांची सुटका करण्यासाठी शेकडो शिवसैनिक आणि मनसैनिकांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यावर धडक दिली. यावेळी गाडीच्या टपावर उभे राहून आदित्य आणि अमित ठाकरे यांनी संबोधित केले आणि पोलिसांना इशारा दिला. त्यानंतर आंदोलकांची कोठडीतून सुटका करण्यात आली.
Comments are closed.