मुंबई आणि ठाण्याला उष्णतेचा यलो अलर्ट; सांताक्रुझमध्ये 38 अंश कमाल तापमान
ग्रामीण भागाप्रमाणेच मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात उष्णतेने कहर केला आहे. दोन दिवसांपूर्वी उष्णतेची लाट धडकल्यानंतर रविवारी पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली. सांताक्रुझ येथील हवामान केंद्रावर 38 अंश कमाल तापमानाची नोंद झाली, तर ठाण्याचा पाराही 37.2 अंशांवर झेपावला. हवामान खात्याने मुंबई आणि ठाण्यासाठी उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांसह संपूर्ण महानगर क्षेत्रासाठी रविवारचा दिवस तापदायक ठरला. सुट्टीच्या निमित्ताने कुटुंबियांसोबत घराबाहेर पडलेल्या नागरिकांना तीव्र उन्हाचे चटके सहन करावे लागले. रविवारी शहराच्या अनेक भागांत उष्ण व दमट हवामान राहिल्याने नागरिकांची दमछाक झाली. तापमानाने सायंकाळपर्यंत 38 अंशांची उच्चांकी पातळी गाठली. शुक्रवारी शहरात उष्णतेची लाट धडकली होती. त्यावेळी पारा 38 अंशांच्या घरात गेला होता. त्याच उष्णतेची पुनरावृत्ती रविवारी दिसून आली. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुंबई-ठाण्यासह पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिह्यांना उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी केला.
हवेच्या गुणवत्तेनेही चिंता वाढवली
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘समीर’ अॅपवरील नोंदीनुसार मुंबईच्या हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 101 इतका नोंदवण्यात आला. हा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत मोडत असून या श्रेणीतील हवेच्या गुणवत्तेमुळे आजारी लोक आणि श्वसनविकाराच्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, असे तज्ञांनी म्हटले आहे. तापमानवाढीबरोबरच हवेची गुणवत्ता ढासळण्यास सुरुवात झाल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.
वांद्रे-कुर्ला संकुलात सर्वाधिक निर्देशांक
मुंबईतील विविध निरीक्षण केंद्रांपैकी वांद्रे-कुर्ला संकुलात सर्वाधिक 424 इतका एक्यूआय नोंदवला गेला. त्यापाठोपाठ देवनार (137) आणि माझगाव (115) यांचा क्रमांक लागला. तसेच बोरिवलीमध्ये 79, मालाड-95, घाटकोपर-67, कुलाबा- 75 आणि भायखळय़ात- 73 इतक्या एक्यूआयची नोंद करण्यात आली. मुंबई महानगर क्षेत्रात ठाणे येथे 74, नवी मुंबईत 80 आणि कल्याणमध्ये 82 इतका एक्यूआय नोंदवला गेला.
Comments are closed.