आयपीएल 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सची मोठी घोषणा! ‘या’ माजी खेळाडूकडे सहाय्यक प्रशिक्षकपदाची जबाबदारी
2011च्या वनडे विश्वचषकातील हिरो आणि अभिषेक शर्मा व प्रभसिमरन सिंग यांसारख्या फलंदाजांना प्रशिक्षण देणाऱ्या माजी दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंगची (Yuvraj Singh) दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमियर लीगच्या 20व्या हंगामापूर्वी (IPL 2027) सहाय्यक प्रशिक्षक आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. प्रशिक्षक म्हणून युवराज सिंगची ही पहिलीच जबाबदारी असेल. तो सौरव गांगुलीसोबत (Saurav Ganguly) मिळून काम करणार आहे. आगामी हंगामापूर्वी सौरव गांगुलीची (Head Coach of Delhi Capitals) दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
304 वनडे सामने, 58 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आणि 40 कसोटी सामने खेळलेल्या 44 वर्षीय युवराज सिंगने गेल्या काही वर्षांत अनेक युवा खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. आता तो प्रशिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. युवराज सिंग आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससोबत आपल्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीला सुरुवात करेल.
या नियुक्तीमुळे युवराज सिंगचे दिल्ली कॅपिटल्सच्या संघात पुन्हा एकदा पुनरागमन झाले आहे. 2015 मध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळला होता. त्यावेळी दिल्लीच्या संघाने त्याला तब्बल 16 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्यामुळे तो त्या काळात आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला होता. त्या हंगामात युवराजने दिल्लीच्या संघाकडून सर्व 14 सामने खेळले होते.
दिल्ली कॅपिटल्सचा सहाय्यक प्रशिक्षक आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर युवराज सिंग म्हणाला, दिल्ली कॅपिटल्ससोबत (Delhi Capitals) माझ्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. या संघासोबत माझे जुने नाते आहे आणि संघाच्या मालकांनाही मी चांगल्या प्रकारे ओळखतो. त्यामुळे ही माझ्यासाठी खास संधी आहे.
तसेच, दादासोबत प्रशिक्षक म्हणून काम करण्यासाठीही मी उत्सुक आहे. प्रशिक्षण देणे ही माझी आवड आहे. त्यामुळे या प्रतिभावान संघासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. हा माझ्यासाठी एक रोमांचक प्रवास असेल, याची मला खात्री आहे. संघाच्या यशात योगदान देण्यासाठी मी उत्सुक आहे.
Comments are closed.