पडद्याआडून – जुन्या यशाची नवी आवृत्ती आणि नव्या नाटकांची नवी आव्हानं!

>> पराग खोत

मराठी रंगभूमीवर सध्या एकाच वेळी अनेक प्रवाह वाहताना दिसत आहेत. कुठे लोकप्रिय कलाकारांची नवी नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत, कुठे जुन्या गाजलेल्या नाटकांना नव्या संचातून पुनरुज्जीवन मिळत आहे. काैटुंबिक नात्यांपासून बुद्धिमान विनोदापर्यंत वेगवेगळे विषय रंगमंचावर आकार घेत आहेत. त्यामुळे हा नवा नाटय़हंगाम केवळ नव्या प्रयोगांचा नसून निर्माते, कलाकार आणि प्रेक्षक या तिघांच्याही अपेक्षांची परीक्षा पाहणारा ठरणार आहे.

मुक्ता बर्वेची नवी नाट्यभेट!

‘कोड मंत्र’ आणि ‘चारचौघी’ या नाटकांनंतर मुक्ता बर्वे पुन्हा एका नव्या नाटकातून प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘पुन्हा नक्की भेटू’ हे देबू बर्वे लिखित नाटक 23 ऑक्टोबरला रंगभूमीवर दाखल होणार आहे. मुक्ता बर्वेसोबत प्रियदर्शन जाधव, अंशुमन विचारे आणि आरती वडगबाळकर यांच्या भूमिका असून मीरा वेलणकर दिग्दर्शन करीत आहेत. या नाटकाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे मुक्ता बर्वे आणि मीरा वेलणकर या घनिष्ट मैत्रिणी पहिल्यांदाच निर्मितीक्षेत्रात एकत्र आल्या आहेत. या निमित्ताने ‘रंगमाया’ या नव्या नाटय़संस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. कलाकारांनी अभिनयासोबत निर्मितीची जबाबदारी स्वीकारणं, हा बदलत्या नाटय़व्यवसायातील महत्त्वाचा पैलू आहे. मात्र, मुक्ता बर्वेच्या यापूर्वीच्या भूमिकांची छाप पुसून हे नाटक स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

'प्रश्न थोडा नाजूक आहे'-ः पुन्हा एकदा कसोटी!

‘आमने सामने’ या नाटकातून प्रेक्षकांची पसंती मिळवलेली लीना भागवत आणि मंगेश कदम ही जोडी आता ‘प्रश्न थोडा नाजूक आहे’ या नव्या नाटकातून एकत्र येत आहे. मिहीर राजदा लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकाकडून अपेक्षा निर्माण होणं स्वाभाविक आहे. अनुभवी कलाकारांची रंगमंचावरील सहजता आणि त्यांच्यातील अभिनयाची देवाणघेवाण हे नाटकाचं बलस्थान ठरू शकतं. नव्या नाटकाला स्वतःचं व्यक्तिमत्त्व मिळवून देणं, हे कलाकारांइतकंच लेखक-दिग्दर्शकांसमोरचं आव्हान असतं. ‘आमने सामने’ची आठवण ताजी असताना ‘प्रश्न थोडा नाजूक आहे’ प्रेक्षकांना कोणता नवा अनुभव देतं, याची उत्सुकता आहे.

'माकडाच्या हाती शॅम्पेन'- जुन्या विनोदाला नवा रंग!

डॉ. विवेक बेळे लिखित ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’ हे नाटक नव्या संचातून पुन्हा रंगभूमीवर येण्याच्या तयारीत आहे. या नाटकाच्या पूर्वीच्या प्रयोगात आनंद इंगळे, संदेश कुलकर्णी, संदेश जाधव आणि शर्वाणी पिल्ले यांच्या भूमिका होत्या. नव्या आवृत्तीचं दिग्दर्शन मंगेश कदम करणार असून निर्मितीची जबाबदारी लीना भागवत यांच्याकडे आहे. नव्या संचातील कलाकारांची घोषणा अद्याप झालेली नाही. डॉ. विवेक बेळे यांच्या लेखणीतील, विसंगतीतून विनोद शोधण्याची हातोटी आणि सामाजिक संदर्भांना हलक्याफुलक्या पद्धतीने भिडण्याची शैली यामुळे या नाटकाकडून अपेक्षा आहेत. जुन्या नाटकाचं पुनरुज्जीवन करताना केवळ लोकप्रिय आठवणींवर विसंबून चालत नाही. आजच्या प्रेक्षकांना हसवतानाच नाटकातील विनोद तितकाच ताजा आणि परिणामकारक वाटणं आवश्यक आहे. नव्या कलाकारांच्या सहभागातून जुन्या कलाकृतीला नवा आयाम मिळतो का, हा या पुनरुज्जीवनाचा खरा कस असेल.

याशिवाय अनेक मोठय़ा निर्मिती संस्था आणि दिग्गज निर्माते नव्या नाटकांच्या तयारीत गुंतले आहेत. मध्यंतरी भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या ‘अफलातून’ या जुन्या गाजलेल्या नाटकाची जाहिरात पाहण्यात आली होती. प्रचंड मोठा नटसंच असलेलं हे नाटक जर पुन्हा रंगभूमीवर सादर झालं तर ती नाटय़रसिकांसाठी मेजवानी ठरेल. तसंच अस्मय थिएटर्स आणि निर्माता अजय विचारे त्यांच्या नव्या नाटकांच्या तयारीत गुंतले आहेत. ‘मास्टर माईंड’, ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ आणि ‘एकदा पाहावं करून’ नंतर ते कोणती नवी नाटपं घेऊन येताहेत ते पाहणं औत्सुक्याचं आहे.

तसंच प्रायोगिक रंगभूमीवर सध्या वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत आणि ते प्रेक्षकांना आवडतायत. तिथूनही व्यावसायिक रंगभूमीला कसदार संहिता आणि सशक्त कलावंत मिळण्याची शक्यता निर्माण झालीय. साजिरी जोशी, कविता मोरवणकर, जान्हवी दरेकर, ऋचा आपटे आणि अश्विनी कासार या दमदार नवदुर्गा योग्य संधी मिळाली तर तिचं सोनं करू शकतील या क्षमतेच्या आहेत.

नवी नाटकं, नवी गणितं!

या सर्व गोष्टींकडे पाहताना मराठी रंगभूमीच्या बदलत्या स्वरूपाची जाणीव होते. लोकप्रिय कलाकारांचं आकर्षण, नव्या नाटय़ संस्थांची निर्मिती, जुन्या कलाकृतींचं पुनरुज्जीवन आणि घराघरातल्या प्रश्नांना भिडणारे विषय, असे विविध प्रवाह एकाच वेळी दिसतात.

प्रेक्षकांना नाटय़गृहापर्यंत आणणं महत्त्वाचं; पण त्यांना पुन्हा नाटक पाहायला प्रवृत्त करणारा आशय, अभिनय आणि सादरीकरणाचा दर्जा टिकवणं त्याहून महत्त्वाचं आहे. मराठी रंगभूमीला जुन्या नाटकांचा वारसा हवा, लोकप्रिय कलाकारांचं आकर्षणही हवं आणि नव्या लेखकांच्या कल्पनाशक्तीलाही वाव हवा. अखेरीस प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करणं हेच प्रत्येक नाटकाचं ध्येय असतं. पडदा उघडताना उत्सुकता निर्माण करणं सोपं; पडदा पडल्यानंतरही नाटक मनात रेंगाळणं, हीच खरी कसोटी!

Comments are closed.