दोन आठवड्यांत 21 शाळांना टाळे, रायगड झेडपीच्या शाळांची अस्तित्वाची लढाई
रायगडात जिल्हा परिषदेच्या शाळांना अखेरची घरघर लागली आहे. पटसंख्या वाढावी यासाठी विविध उपाययोजना करूनही इंग्लिश मीडियमच्या शाळांकडे वाढणारा ओढा यामुळे झेडपीच्या शाळा अक्षरशः ओस पडू लागल्या असून रायगडात दोन आठवड्यांत 21 शाळांना टाळे लागले आहे. या शैक्षणिक वर्षात आतापर्यंत 25 शाळा बंद पडल्या आहेत. त्यामुळे : जिल्हा परिषदेच्या शाळांवर अस्तित्वाची टांगती तलवार आहे.
2026/27 या शैक्षणिक वर्षात बंद करण्यात आलेल्या 25 जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पेण तालुक्यातील 6 शाळांचा समावेश आहे तर महाड 5, म्हसळा 5, श्रीवर्धन 3, मुरुड 2, सुधागड 2, माणगाव 1 व तळा तालुक्यातील एका शाळेचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे जिल्ह्यातील तब्बल 360 जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या 5 पर्यंत घसरल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामुळे भविष्यात या शाळांची पटसंख्या वाढवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. अन्यथा पुढील काही वर्षांत या शाळा टप्प्याटप्प्याने पटसंख्येअभावी बंद पडण्याचा धोका आहे. यामध्ये महाड तालुक्यातील सर्वाधिक 95 शाळांचा समावेश आहे. तर अलिबाग 15, कर्जत 4, खालापूर 1, माणगाव 45, म्हसळा 24, मुरुड 19, पनवेल 2, पेण 25, पोलादपूर 46, रोहा 30, श्रीवर्धन 18, सुधागड 11, तळा 25 शाळांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढता कल आणि सरकारी शाळांबाबतचा कमी होत चाललेला विश्वास यांसारख्या प्रश्नांमुळे जिल्हा परिषद शाळांसमोर अस्तित्वाची लढाई उभी ठाकली आहे. दोन आठवड्यांत 21 शाळा बंद होणे ही ग्रामीण शिक्षणव्यवस्थेसाठी चिंतेची बाब आहे.
शाळा बंद पडण्यामागील कारणांचा सखोल आढावा घेणे, गावपातळीवर विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आणि पालकांचा सरकारी शाळांवरील विश्वास पुन्हा संपादन करणे, ही आता शिक्षण विभागासमोरील प्रमुख आव्हाने आहेत. अन्यथा विद्यार्थ्यांअभावी शाळांना टाळे लागत राहिल्यास ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो.
ऑनलाइन पोर्टलवरील नोंदींमध्ये विद्यार्थीसंख्या शून्य
रायगड जिल्ह्यातील आणखी सात जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येची पडताळणी अद्याप बाकी आहे. या शाळांच्या ऑनलाइन पोर्टलवरील नोंदींमध्ये विद्यार्थीसंख्या शून्य दिसत असल्याने प्राथमिक शिक्षण विभागाने संबंधित शाळांशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. प्रत्यक्षात या शाळांमध्ये विद्यार्थी नसल्यामुळे त्या बंद पडण्याच्या स्थितीत आहेत की, काही तांत्रिक अथवा अन्य कारणांमुळे विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाइन नोंदवता आलेली नाही, याची तपासणी केली जात आहे. या सात शाळांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील बंद शाळांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थलांतर, इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढलेला पालकांचा कल यामुळे पटसंख्या घटत आहे. आम्ही घरोघरी जाऊन आपल्या पाल्यांना झेडपी शाळेत पाठवा यासाठी पालकांना विनंती करत आहोत, असे
प्रभारी शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग सुनील भोपळे म्हणाले.
Comments are closed.