ठाणे पोलिसांची ‘तत्परता’, नवरात्र संपेपर्यंत शिंदेंच्या घरावर मोर्चा न काढण्यासाठी राम पूर्णेकरांकडून लेखी घेतले

शिवसेना विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याकांडामागील मास्टरमाइंडचा नवरात्रोत्सव संपेपर्यंत शोध लावून आम्हाला न्याय द्या अन्यथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करू, असा इशारा राम पूर्णेकर यांनी दिला होता. यामुळे खडबडून जाग आलेल्या ठाणे पोलिसांनी मानपाडा गाठत पूर्णेकर कुटुंबीयांवर दबाव टाकला. नवरात्रोत्सव संपेपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या घरावर मोर्चा काढणार नाही, असे लेखी हमीपत्रच राम पूर्णेकर यांच्याकडून घेतले. पोलिसांच्या या ‘तत्परते’विरोधात पूर्णेकर कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला असून पोलीस नेमके कुणासाठी काम करीत आहेत, असा सवाल केला.

प्रदीप पूर्णेकर हत्याकांडातील 5 मारेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र या हत्येचे खरे मास्टरमाइंड अद्याप मोकाट असल्याचा आरोप प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णकर यांनी केला आहे. पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी न्याय मागण्यासाठी त्यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती. या प्रकरणात याय मिळावा यासाठी पूर्णकर कुटुंबीयांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशाराही काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला होता.

आंदोलन करायचे असल्यास परवानगी घ्यावी लागेल

राम पूर्णेकर यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर ठाणे पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. कापूरबावडी पोलिसांनी पूर्णेकर यांचे घर गाठत राम पूर्णेकर यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतले. नवरात्र संपेपर्यंत मी शिंदेंच्या घरावर मोर्चा काढणार नाही, शिंदेच्या घरावर आंदोलन करायचे असल्यास आधी पोलीस परवानगी घ्यावी लागेल, असे हमीपत्रात नमूद करण्यात आले आहे.

शिवसेनेची ‘लिगल टीम’ पूर्णेकर कुटुंबीयांना कायदेशीर मदत करणार

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या शिवसेनेच्या लिगल टीमने त्यांच्या कुटुंबीयांना दिले आहे. त्यांना कायदेशीर सल्ला तसेच न्यायालयीन प्रक्रियेमध्येदेखील ही टीम त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. दरम्यान शिवसेनेच्या लिगल टीममधील सदस्यांनी पूर्णेकर कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि आस्थेने विचारपूसही केली. पूर्णेकर कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी लिगल टीम आता मैदानात उतरली आहे.

पूर्णेकर हत्येप्रकरणी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. या हत्येचा कट माजी महापौर मीनाक्षी शिंदे व त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनी रचल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबाने केला. त्यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनीही पुरवणी जबाबात त्यांची नावे घेतली आहेत. शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर गुन्हे शाखेने राजेंद्र शिंदे यांची दोन दिवस प्रदीर्घ काळ विचारपूस केली.

याप्रकरणी ठाणे न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे. पूर्ण न्याय मिळेपर्यंत शिवसेना पूर्णेकर कुटुंबाच्या पाठीशी उभी राहील, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यानुसार गुरुवारी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, लिगल टीमचे अध्यक्ष अॅड. नितीश सोनवणे, उपाध्यक्षा अॅड. स्वप्ना कोदे, मीडिया समन्वयक अॅड. दर्शना जोगदनकर, अॅड. आकांक्षा राणे, अॅड. दिलीप कोकीळ, अॅड. सुनील चव्हाण, अॅड. प्रिया चिवरीकर आदी उपस्थित होते.

Comments are closed.