दिवसा कुत्र्यांना फिरण्यास बंदी

चीन हा अनेक संदर्भांमध्ये एक अनोखा देश आहे. येथील नियम इतर देशांमधील नागरीकांना चक्रावून टाकणारे असतात. तसेच प्रत्येक शहरातील नियम वेगवेगळे असू शकतात. या देशातील हँगझोऊ शहराच्या महानगरपालिकेने एक विचित्र नियम केला आहे. या नियमानुसार नागरीकांवर दिवसा त्यांच्या पाळलेल्या श्वानांना फिरवून आणण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, या शहरात केवळ छोट्या श्वानांनाच संध्याकाळी 7 वाजल्यानंतर फिरावयास नेण्याची अनुमती आहे. तर मोठ्या श्वानांवर कोणत्याही वेळी बाहेर फिरावयास नेण्यावर पूर्ण बंदी आहे. इतकेच नव्हे, तर श्वानपालन करायचे असेल तर विशेष अनुमती घेण्याची आवश्यकता असते. मोठ्या श्वानांना फिरावयास नेल्यास किंवा लहान आकाराच्या श्वानांना संध्याकाळी 7 वाजण्याच्या आधी फिरावयास नेल्यास 2,500 रुपये ते 12 हजार रुपयांपर्यंतचा दंड आहे.

वारंवार नियम मोडल्यास श्वान पाळण्याची अनुमती रद्द केली जाते. कित्येक नागरीकांना हे अत्यंत नियम जाचक वाटतात. तथापि, नागरीकांनी नाराजी व्यक्त केली, तरी या नियमांमध्ये कोणतेही परिवर्तन होत नाही. केवळ श्वान आजारी असेल आणि त्याला डॉक्टरकडे न्यावे लागणार असेल, तरच मोठ्या किंवा लहान श्वानांना दिवसा बाहेर काढले जाऊ शकते. पण तसे करताना श्वानपालन प्रमाणपत्र आणि श्वानाच्या लसीकरणाचे प्रमाणपत्र स्वत:जवळ ठेवावे लागते. बाहेर नेलेल्या श्वानाने सार्वजनिक स्थानी घाण केल्यास मालकाला ती उचलून स्वत:बरोबर न्यावी लागते. तसेच बाहेर नेताना श्वानाच्या गळ्यात पट्टा बांधणे आणि दोरी आपल्या होती ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. या शहराच्या व्यवस्थापनाने हे नियम 1996 मध्ये बनविले आणि 2004 मध्ये त्यांच्यात परिवर्तन करण्यात येऊन ते अधिक कठोर करण्यात आलेले असल्याने अनेक नागरीकांनी नाराजीचा सूर लावला आहे. मात्र, या नियमांचे समर्थन करणाऱ्यांचाही एक मोठा वर्ग आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी हे नियम आवश्यक आहेत, असे प्रशासनाचे आणि समर्थन करणाऱ्यांचे म्हणणे आहे. तर यामुळे श्वानपालकांना विनाकारण त्रास होतो. इतके कठोर नियम आवश्यक नाहीत, असे विरोधकांचे मत आहे. पण प्रशासन मात्र नियमांची चिकटून आहे.

Comments are closed.