लेन्स-आय – स्वीकाराचा बहर…
>> क्षिप्रा मुंढे
शब्दांना ठावे शब्दांच्या वाटा असाच काहीसा अनुभव देणारी कविता मनात खोल खोल रुजू लागते. कवितेची रुजवण अशीच होते. अनुभवाशी खोलवर जोडली जाते प्रत्येकाचं आयुष्य एक काव्यच. त्यातली गेयता आपण जाणायची की आपला आपला सूर आपोआप गवसतो आपल्याला. जगाच्या पलीकडे लपलेल्या अर्थपूर्णतेचा, सौंदर्याचा शोध ज्यांच्या कवितेपाशी येऊन थांबावा असे आवडते कवी द. भा. धामणस्कर. त्यांच्या प्राक्तनाचे संदर्भ या काव्यसंग्रहातील ही कविता. धामणस्करांना निसर्गाशी केवढं ममत्व होतं हे अनुभवतो आपण या कवितेत. कवितेतील शेवटच्या ओळी तर फार फार अर्थपूर्ण.
अशी काही पाने उरतीलच, ती सर्व
कुठल्याही झाडाच्या तळाशी ठेवावीत
तुम्हीच झाडांचे बहर आहात, असे
मीच त्यांना कैकदा सांगितले आहे
शब्द नव्याने वाहावेत यासाठीचं हे रुजणं महत्त्वाचं… यासाठीचं निर्लेप होणं अन् स्वतला समजावणंही…
समजुतीचा, स्वीकाराचा हा बहर नव्याने वहावा अन् त्याची गाणी व्हावीत अशी खोल खोल समज देणारी त्यांची ही कविता अन् निसर्गाचं संवेदन अगदी अनुरूप होऊन जाते. आपल्यातली समज उमज वाढवताना निसर्गही काव्य होऊन आपल्यासमोर येतो. त्यातली लय समजून घेत समेवर येताना बरच काही गवसतं. हे मौक्तिक क्षण पारिजातकासारखे. त्यांना अनुभवावं, त्यातला गंध साठवून ठेवावा. ही अनुभूती अगदी तरल असते. निसर्गसंवेदन आपल्याला जगायला शिकवतं. या सृजनाशी आगळं ममत्व निर्माण होतं आणि त्याकडे अलिप्तपणे पाहण्याची समजही देतं. सह्याद्रीतल्या पानाफुलांना भेटण्यातली पायपीट भटक्यांसाठी अनोखी नसली तरी हे संवेदन मात्र प्रत्येक वेळी नवी दृष्टी बहाल करतं. त्या आंतरिक अनुभवाला सहस्त्रगात्रांनी सामोरं जायला हवं. सह्याद्रीतल्या या रानफुलांना नावगाव नसतं. सह्याद्रीच्या लेकरांप्रमाणे हुंदडण्याचं भाग्य लाभलेली ही रानफुलं… अनामिक अशा या फुलांशी अवचित क्षणी तरल संबंध रुजून येतो. हा स्वीकाराचा बहर असतो… ज्या ज्या क्षणी या भेटी घडतात त्या त्या क्षणी तो पुन: पुन्हा नव्याने वाहत राहतो. निसर्गासोबतच्या स्वीकाराचा हा बहर मातीशी निष्ठावान असलेल्या झाडं, फुलं, पानं, मोहोर यांच्यासारखाच रुजत फुलत जातो.
Comments are closed.