युरेनियम उत्पादनात 50 टक्क्यांपर्यंत घट होण्याचा धोका
भारताच्या अणुऊर्जा महत्त्वाकांक्षेला धक्का : मोठ्या ऊर्जासंकटाच्या दिशेने जग
जगभरात यूरेनियमच्या उत्पादनात भविष्यात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून त्यामुळे जागतिक अणुऊर्जा क्षेत्रासमोर गंभीर आव्हान निर्माण होऊ शकते. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (आयएईए) अहवालानुसार, 2040 पर्यंत यूरेनियम उत्पादनात किमान 50 टक्क्यांपर्यंत घट होण्याचा धोका आहे. याचा परिणाम भारताच्या महत्त्वाकांक्षी अणुऊर्जा विस्तार योजनेवरही होण्याची शक्यता आहे.
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारताने 2047 पर्यंत अणुऊर्जा निर्मिती क्षमता 100 गिगावॅटपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, सध्या देशाची स्थापित अणुऊर्जा क्षमता 9 गिगावॅटपेक्षाही कमी आहे. यूरेनियमचा जागतिक पुरवठा कमी झाल्यास या उद्दिष्टापर्यंत पोहोचणे भारतासाठी अधिक आव्हानात्मक ठरू शकते.
आयएईएच्या ‘यूरेनियम 2024 : रिसोर्सेस, प्रॉडक्शन अँड डिमांड या अहवालानुसार 2050 पर्यंत जगाला किमान 90,045 टन यूरेनियमची आवश्यकता भासू शकते. मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्यास हा आकडा 1,42,631 टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या जागतिक स्तरावर सुमारे 60 हजार टन यूरेनियमची मागणी आहे. त्यामुळे भविष्यात मागणी वाढत असताना उत्पादनात घट झाल्यास पुरवठा आणि मागणी यांच्यात मोठी तफावत निर्माण होऊ शकते.
नवीन खाणी सुरू करण्याची गरज
यूरेनियमचा संभाव्य तुटवडा टाळण्यासाठी नवीन खाणी विकसित करणे, सध्या कार्यरत असलेल्या खाणींची उत्पादन क्षमता वाढविणे आणि बंद पडलेल्या खाणी पुन्हा सुरू करणे आवश्यक ठरणार आहे. यासाठी मोठ्या गुंतवणुकीबरोबरच दीर्घकालीन नियोजन आणि पुरवठा साखळी मजबूत करण्यावर भर द्यावा लागेल.
भारताच्या अणुऊर्जा विस्तारासमोर आव्हान
भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाला पूर्वी आंतरराष्ट्रीय निर्बंध आणि देशांतर्गत यूरेनियमची कमतरता यामुळे अडथळ्यांचा सामना करावा लागला होता. आता अणुऊर्जा निर्मिती वाढविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. 31 जुलै 2026 पर्यंत भारताची स्थापित अणुऊर्जा क्षमता 8.78 गिगावॅट होती.
2047 पर्यंत गिगावॅटचे उद्दिष्ट
साध्य करण्यासाठी सुमारे 15 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास करणे हेही या धोरणाचे महत्त्वाचे भाग आहेत. 2031-23 पर्यंत देशाची अणुऊर्जा क्षमता 22.38 गिगावॅटपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, यूरेनियमचा पुरवठा पुरेसा आणि नियमित राहणे या विस्तारासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारआहे.
Comments are closed.