कोस्टल रोडसाठी एका दिवसात उभारले दहा गर्डर्स, 45 टक्के काम पूर्ण घोडबंदर रोडची वाहतूककोंडी दूर होणार
खारेगाव टोलनाका ते गायमुखदरम्यानच्या कोस्टल रोडचे काम 45 टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी एमएमआरडीएच्या अभियंत्यांनी उत्तुंग कामगिरी करीत एका दिवसात दहा आय गर्डर्सची उभारणी यशस्वी केली आहे. बांधकाम क्षेत्रातील हा नवा विक्रम असून कोस्टल रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी दूर होणार आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास एमएमआरडीएने व्यक्त केला आहे.
खारेगाव टोलनाका ते गायमुख यांना जोडणारा 13.45 किलोमीटर लांबीचा सहापदरी कोस्टल रोड उभारण्यात येत आहे. सध्या घोडबंदर रोडवर दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. त्यामुळे प्रवाशांची लटकंती होत असून कामावर जाणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. घोडबंदर रोडला पर्यायी मार्गावरून हा कोस्टल रोड असून तो पूर्ण झाल्यानंतर ठाणेकरांच्या वाहतुकीचा जांगडगुत्ता सुटणार आहे. या कोस्टल रोडवर अत्याधुनिक गर्डर्स उभारणे हे मोठे आव्हान आहे. पण एमएमआरडीएने एका दिवसात दहा गर्डर्स उभारून महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
3 हजार 364 कोटींचा खर्च
ठाणे कोस्टल रोड-1 या प्रकल्पामुळे वाहतूककोंडीचा ताण कमी होईल. त्याचबरोबर मुंबई ते नाशिक महामार्ग आणि गायमुखदरम्यान पर्यायी मार्ग अधिक सक्षमपणे उभा राहणार आहे. हा कोस्टल रोड सहा लेनचा असून संपूर्ण प्रकल्पासाठी 3 हजार 364 कोटी रुपये खर्च येणार आहे. कोस्टल रोडचे काम आजपर्यंत 45 टक्के एवढे पूर्ण झाले असून ते जलदगतीने मार्गी लागण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
ही आहेत वैशिष्ट्ये
- कोस्टल रोडवर 240 मीटरचा खाडी पूल असून 8.11 किमीचा एलिव्हेटेड मार्ग राहणार आहे.
- ठाण्यातील कोस्टल रोड हा देशामधील पहिला ग्रीन फिल्ड रोड आहे.
- घोडबंदर रोडची ट्रॅफिककोंडी दूर होणार.
- हा प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य.
Comments are closed.