कोट्यवधींचे आसना गार्डन प्रशासकीय वादात अखेरची घटका मोजतेय.! झाडांना कीड, ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

नांदेड शहरातील चैतन्यनगर ते विमानतळ रोडवर कोट्यवधी रुपये खर्च करून विकसित करण्यात आलेले मराठवाड्यातील सर्वांत लांब गार्डन म्हणून ओळखले जाणारे आसना गार्डन आज प्रशासकीय अनास्थेच्या विळख्यात सापडले आहे. एकीकडे नांदेड महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात गार्डनच्या हस्तांतरणाचा तिढा कायम आहे, तर दुसरीकडे पाणी, देखभाल आणि संगोपनाअभावी झाडे वाळत आहेत, हिरवळ जळत आहे आणि शोभेच्या झाडांना किडीने पोखरले आहे. कोट्यवधींच्या या सार्वजनिक मालमत्तेची अशी वाताहत होत असताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासन नेमके करतात तरी काय, असा संतप्त सवाल आसना मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीने उपस्थित उपस्थित करण्यात आला आहे.

सुमारे १ हजार ७३६ मीटर लांबीचे आसना गार्डन मार्च २०२६ अखेर विकसित करण्यात आले. एप्रिलपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने गार्डन महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी चार पत्रे दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हस्तांतरणाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. दोन्ही शासकीय यंत्रणांमधील तांत्रिक आणि प्रशासकीय घोळात गार्डनच्या देखभालीची जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न अनुत्तरित आहे. अधिकाऱ्यांच्या फाइलांचा प्रवास सुरू; पण गार्डनमधील हिरवळीचा श्वास मात्र कोंडला. हस्तांतरणाच्या प्रक्रियेत त्रुटी शोधण्यापेक्षा गार्डनचे अस्तित्व टिकविण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र, प्रत्यक्षात गार्डनची सिंचन व्यवस्था कोलमडली असून झाडे, झुडपे आणि हिरवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. वेळेत पाणी, कीडनियंत्रण आणि नियमित देखभाल झाली नाही, तर या गार्डनचे सौंदर्य इतिहासजमा होण्यास वेळ लागणार नाही.

दररोज सकाळी आणि सायंकाळी शेकडो नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि आरोग्यप्रेमी या गार्डनमध्ये फिरण्यासाठी येतात. मात्र, अस्वच्छता आणि देखभालीअभावी परिसराची अवस्था बिकट होत असल्याची तक्रार आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी उभारलेले गार्डनच दुर्लक्षामुळे आरोग्याच्या दृष्टीने गैरसोयीचे ठरणार असेल, तर या विकासकामाचा उपयोग काय? सार्वजनिक मालमत्ता उभारण्यासाठी निधी खर्च करायचा आणि नंतर तिच्या संगोपनाची जबाबदारी एकमेकांवर ढकलायची, ही कोणती प्रशासन व्यवस्था?

गार्डनची दुरवस्था पाहवत नसल्याने आसना मॉर्निंग वॉक ग्रुपने आता लोकसहभागातून गार्डनच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. ग्रुपचे अध्यक्ष आनंद कल्याणकर यांनी नागरिकांना स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. केवळ प्रशासनाच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा आपल्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या गार्डनच्या आरोग्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढे यावे, अशी भूमिका ग्रुपने घेतली आहे.

रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ ते ७.३० या वेळेत आसना गार्डनमध्ये स्वच्छता मोहीम आणि श्रमदान करण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कचरा गोळा करावा, परिसर स्वच्छ ठेवावा आणि गार्डनच्या देखभालीसाठी आवश्यक असलेल्या बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

गार्डनमधील झाडे पूर्णपणे वाळत असून अनेक ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका आणि महापौर तातडीने लक्ष घालणार का? गार्डनच्या हस्तांतरणाचा निर्णय होईपर्यंत त्याच्या देखभालीची जबाबदारी कोण घेणार? सिंचन व्यवस्था पूर्ववत करून झाडांचे संवर्धन आणि नियमित स्वच्छतेसाठी तातडीची यंत्रणा उभी राहणार का? असा प्रश्न आनंद कल्याणकर, अध्यक्ष, आसना मॉर्निंग वॉकर्स ग्रुप यांच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.

Comments are closed.